अहिल्यानगर: जिल्हा पोलीस दलातील तीन पोलीस अधिकार्‍यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर २६ पोलीस अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही पदके जाहीर करण्यात आली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतींकडून शौर्यपूर्ण कामगिरी, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदारांना विविध पदके जाहीर केली जातात. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संपत मुरलीधर खैरे (सुपा पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक शैलेश चंद्रकांत उपासनी (नागरी हक्क संरक्षण) आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यदअली सय्यद (पोलीस मुख्यालय) यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन, निष्ठावान आणि निष्कलंक सेवेचा गौरव करण्यासाठी उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केली आहेत. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात १५ ते २५ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण करताना अत्यंत निष्ठेने, कौशल्याने, धैर्याने आणि अखंडपणे कर्तव्य बजावणार्‍या २६ अधिकारी-अंमलदारांची या सन्मानासाठी निवड झाली आहे. या अधिकारी व अंमलदारांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे प्रतिबंध व तपास, नागरिकांच्या सुरक्षेसह विविध जबाबदार्‍या पार पाडताना उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या दीर्घकालीन आणि गुणवत्तापूर्ण सेवेला केंद्र सरकारने उत्कृष्ट सेवा पदकाच्या माध्यमातून गौरविले आहे.

यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शेजवळ, संजय खंडागळे, अन्वरअली सय्यदअली सय्यद, विजय लोंढे, किरण शेलुकर, पोलीस अंमलदार सचिन पवार, रेहान शेख, कृष्णा कुर्‍हे, दिगंबर कारखिले, रंगनाथ नरसाळे, मल्लिकार्जुन बनकर, कृष्णा विधाटे, राजु सुद्रिक, संदीप पवार, संतोष ओव्हळ, सचिन जाधव, दीपक घाटकर, अभिजित अरकल, सुयोग सुपेकर, सुरेश माळी, माधुरी तोडमल, किर्ती कांजवणे, भाग्यश्री भिटे, राहुल सोळुंके, अमोल घुले यांचा समावेश आहे. राष्ट्रपती पदक व केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने उत्कृष्ट सेवा पदक जाहीर केलेल्या अधिकारी व अंमलदारांचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.