अहिल्यानगर:अमली पदार्थांबाबत पोलिस दल सतर्क आहे. या विरोधात कठोरपणे कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यात १ कोटी ७८ लाख ५७ हजार ८१० रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली.
तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी तसेच जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी (दि. ६) अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक सुदर्शन बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, शहर पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे उपस्थित होते.
अफू, गांजा या अमली पदार्थांपेक्षा एमडी पदार्थांचा शोध घेणे कठीण आहे. मात्र गोपनीय माहिती काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तोफखाना, एमआयडीसी व संगमनेरमध्ये अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आराखडा तयार केला जात आहे. शाळा, महाविद्यालयभोवती असलेल्या पान टपऱ्यातून मादक पदार्थांची विक्री केली जात आहे का याचीही माहिती घेतली जात आहे. महापालिका, नगरपालिकांनी अनधिकृत टपऱ्या हटवण्याची मोहीम सुरू केल्यास आवश्यक तेव्हा पोलीस बंदोबस्त दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ जुलै अखेर अमली पदार्थ विरोधी ३२ गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये ५९ आरोपी निष्पन्न झाले आहेत. ६४० किलो १७७ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत एकूण १ कोटी ७८ लाख ५७ हजार ८१० रुपये आहे. याबरोबरच अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या २९६ जणांविरुद्ध ३६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी दिली.
पोलिसांचे जनजागृती अभियान
गुरुवारी ( दि.६) जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली सकाळी ७.३० वा. पोलीस मुख्यालयातून सुरू होणार आहे. यात प्रामुख्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित असणार आहेत. उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली जाणार आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, पोक्सो कायद्याअंतर्गत जनजागृती केली जाणार आहे. तरुणांमध्ये स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेविषयी भान निर्माण करणे हा अभियानाचा उद्देश असल्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी सांगितले.
