अहिल्यानगर: पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना अहिल्यानगर शहराजवळील सोलापूर रस्त्यावरील तुक्कडओढा (ता. अहिल्यानगर) येथे घडली. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यांसह पाच कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वाहनाचे ही नुकसान झाले आहे. यासंदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १०० जणांच्या जमावविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी ३१ जणांची ओळख पटलेली आहे तर उर्वरित ७० जण अनोळखी आहेत. यातील ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश पंडित बेरड (वय ३४), दीपक कुंडलिक बेरड (वय ४५), धर्मा दत्तात्रय बेरड (वय ३०), देविदास शिवाजी बेरड (वय ४४), राजू पंडित बेरड (वय ४३) व मयूर अशोक पुंड (वय ३६, सर्व रा. तुक्कडओढा, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या सहा जणांची नावे असल्याचे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी सांगितले.
यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार सुनील रमेश मालणकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक तपासासाठी करमाळा येथे गेले होते. तेथून परत येत असताना काल, गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास योगेश बेरड याने मोटरसायकल आडवी लावून पोलिसांचे वाहन अडवले. पोलिसांच्या माहितीनुसार योगेशने दारू प्राशन केलेली होती.
पोलिसांनी त्याला समजावत मोटरसायकल बाजूला घ्यायला सांगितली. त्यावरून वाद झाला. त्यानंतर योगेश बेरड याने तुक्कड ओढा व दरेवाडी येथील लोकांना बोलवून घेतले. या जमावाने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. पोलीस पोलीस पथक त्यावेळी साध्या वेशात होते. या दगडफेकीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, कर्मचारी अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे व भगवान धुळे हे किरकोळ प्रमाणात जखमी झाले तसेच पोलिसांच्या वाहनाचेही नुकसान झाले. पोलिसांना तपास करण्यापासून रोखून धरल्याच्या कारणासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या पथकावरच हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. ही घटना केवळ मोटरसायकल बाजूला घेण्यास सांगितल्यावरून झाली की त्यामागे अन्य काही कारणे आहेत याचीही चर्चा होत आहे.
