अहिल्यानगर: प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येत आज, बुधवारी जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा नेण्यात आला. मोर्चामध्ये खासदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे सहभागी झाले होते. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्या, असा एल्गार आंदोलक शिक्षकांनी यावेळी केला. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या विरोधात शिक्षकांनी असंतोष व्यक्त केला.
शिक्षकांना अशैक्षणिक कामाच्या वाढत्या ओझ्यातून मुक्त करा, त्यांना केवळ अध्यापनाचे काम करू द्या, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. शिक्षकांवर बीएलओ, एसआयआर, जनगणना यासारख्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांसह विविध ऑनलाईन ॲप, पोर्टल, गुगल फॉर्म, एक्सेल शीट व माहिती संकलनाचा भार टाकला जात आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची अंमलबजावणी, अनुदानाचा ऑनलाईन हिशोब, सतत मागवली जाणारी माहिती यामुळे शिक्षकांचा अध्यापनासाठी वेळ कमी होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याचा मुद्दा मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केला.
शिक्षण आयुक्तांनी माहिती संकलनासाठी शनिवार हा दिवस निश्चित करून माहितीचा वार शनिवार ही संकल्पना मांडली तसेच शिक्षण सहसंचालक रमाकांत मोरे यांनीही पत्राद्वारे सूचना दिल्या असे असतानाही स्थानिक पातळीवर शिक्षकांना रोज विविध प्रकारची माहिती भरण्याची आदेश दिले जात असल्याची तक्रार करण्यात आली.
मुख्यालय राहण्याची अट शिथिल करावी, शिक्षक शाळांना मिळणाऱ्या अनुदानाचा हिशोब एसएनएस स्पर्श प्रणालीद्वारे सादर करण्याच्या प्रक्रियेमुळे मुख्याध्यापकांवर अतिरिक्त प्रशासकीय जबाबदारी पडत आहे. कागदपत्रे, खर्चाचे हिशेब, ऑनलाइन नोंदीची कसरत करावी लागते. विशेषतः दोन शिक्षकी शाळांमधील शिक्षकांच्या अवस्था अधिक बिकट होत असल्याकडे विविध वक्त्यांनी लक्ष वेधले.
शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी बापूसाहेब तांबे, आबासाहेब जगताप, प्रवीण ठुबे, कल्याण लवांडे, बबन गाडेकर, डॉ. संजय कळमकर, सिताराम सावंत, राजेंद्र ठोकळ, प्रवीण झावरे, राजेंद्र निमसे, गोकुळ कळमकर, नवनाथ अडसूळ, गौतम मिसाळ आदींनी शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. समितीचे कार्यकारी अध्यक्ष नारायण पिसे यांनी आभार मानले.
सादरीकरणातून मागण्यांचा अविष्कार
मोर्चात शिक्षिका मागण्यांचे फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान एका महिला शिक्षिकेच्या अंगात अंबाबाईचा संचार झाल्याचा अविष्कार सादर करत मागण्या मांडण्यात आल्या तर एक शिक्षक यमराजच्या भूमिकेत पाहायला मिळाला. अंबाबाईचा उदो उदो… च्या जयघोषाने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता.
