राहाता: गर्भलिंग बेकायदा तपासणी व अवैध गर्भपात प्रकरणाच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी पुण्यातील आणखी एका डॉक्टर व पारनेरमधील एजंटला अटक केल्याने या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये ७ डॉक्टर, ३ जण वैद्यकीय चालक व एक वैद्यकीय साहित्याचा मोठा पुरवठादार यांचा समावेश आहे. अवैध गर्भलिंग निदान चाचणीसाठी वापरण्यात येणारे ५ सोनोग्राफी यंत्र वेगवेगळ्या जिल्ह्यातून तसेच ४ चारचाकी मोटारी व एक दुचाकी जप्त केल्याची माहिती श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
अटक करण्यात आलेले डॉक्टर अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात गर्भलिंग बेकायदा तपासणी व अवैध गर्भपात करत असले तरी त्यांच्याकडे राज्यभरातून एजंटमार्फत गर्भवती महिला तपासणीसाठी येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
शिर्डीजवळील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळ पिंपरी शिवारात निर्जन ठिकाणी असणाऱ्या शेतातील घरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी तेथे छापा टाकून नेवासा येथील डॉ. राहुल भणगे, एजंट दिलीप भुसाळ व निलेश भवर, महिलांचे सहा नातलग अशा एकूण ९ लोकांना अटक केली होती. अटक आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र, तीन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना प्रदिप ढगे नावाच्या एजंटकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र जप्त करून त्यालाही अटक केली. अधिक तपासात श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे व डॉ. राज शेख यांचा लिंगनिदान चाचण्या व अवैध गर्भपाताच्या प्रकरणात सहभाग आढळल्याने अटक केली. पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत बेकायदेशीर सोनोग्राफी यंत्र विक्री करणाऱ्या पुणे येथील डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (रा. शिरूर, पुणे), डॉ. नीलकंठ अशोक जाधव (रा. लोहगाव, पुणे) व नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा.केशनांदगाव, हवेली, पुणे) या तिघांना अटक केली. त्यानंतर वडगाव मावळ (पुणे) येथील मारुती ढोरे याला अटक करून त्याच्याकडून अवैध लिंग निदान चाचणीसाठी वापरत असलेले यंत्र जप्त केले.
पोलिसांच्या तपासात असे निदर्शनास आले की, पुणे येथून अटक करण्यात आलेले दोन डॉक्टर व एक वैद्यकीय साहित्य विक्रेत्या आरोपींकडून निफाड (नाशिक) तालुक्यातील आणखी एका डॉक्टरने अवैधपणे लिंगनिदान चाचणी करणारे सोनोग्राफी यंत्र विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यानुसार श्रीरामपूर पोलिसांच्या पथकाने निफाड येथील डॉ. कुणाल वलटे यांच्यासह तेथीलच औषध विक्रेता दुकानदार सागर उन्हाळ या दोघांनाही अटक केली.
या गुन्ह्याच्या साखळीत श्रीगोंद्यातील औषध विक्रेता जालिंदर रामदास बोरुडे, (वय ४० वर्षे, रा. घोगरगाव, श्रीगोंदा) याला अटक करण्यात आली. जालिंदर बोरुडे याने बेकायदेशीरपणे अनेक गर्भवती महिलांची लिंगनिदान चाचण्या केल्याचे निष्पन्न झाले व त्यासाठी एजंट म्हणून राम किसन पवार उर्फ तपोश शिबू सरकार (रा. मलठण, कर्जत, अहिल्यानगर) हा मदत करीत असल्याचे आढळल्याने अटक केली. त्याच्याकडे अवैधरित्या गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या आढळल्या आहेत. त्याला न्यायालयाने सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या तपासात पोलिसांना डॉ. अतुल अंकुश जाधव (रा. वाघोली, पुणे) हा बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचण्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यास अटक केली. त्यालाही न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात अटक केलेल्या एकाही आरोपीला दीड महिन्याच्या कालावधीत जामीन झालेला नाही. गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलिस उपअधिक्षक अमोल भारती करीत आहेत.
