अहिल्यानगर:’एसआयआरच्या विषयावरून विरोधकांची सुरू असलेली आंदोलने म्हणजे ‘नौटंकी’ आहे. या लोकांना देशाचे कायदे, घटना मान्य नाही. देशात अराजक माजवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, असा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीस २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भाजपच्या वतीने आयोजित सेवा ज्योती यात्रा व विकसित भारत संकल्प सभेसाठी पालकमंत्री विखे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व दिलीप भालसिंग, समन्वयक विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. विखे म्हणाले, राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलिन करत आहेत. ज्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही ते ‘एसआयआर’वर खापर फोडत आहेत. राहुल गांधी यांच्या पक्षाला जनाधार राहिलेला नाही. जनतेने त्यांना नाकारले आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही या विषयावर विरोधकांना फटकारले आहे. त्यामुळे सर्वांचीच नौटंकी सुरू आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विषयावर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात बोलताना विखे म्हणाले, विरोधकांना आता काम राहिलेले नाही. त्यांच्या अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील आहेत. आयोगाचे सचिवही बदलले गेले आहेत. परंतु विरोधक प्रश्नाचे राजकारण करत आहेत. विद्यार्थ्यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

विखे-थोरात एकत्र येणे आश्चर्य नाही

जिल्हा बँकेत राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात प्रथमच एकत्र आले आहेत, याकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सहकारात राजकारणातील जोडे बाजूला ठेवून वाटचाल करावी ही प्रथा आहेच. तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, हे महत्त्वाचे आहे.

खासदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे- सुजय विखे

इंडिया आघाडीच्या नगरमधील मोर्चासंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे यांनी खासदार नीलेश लंके यांच्यावर टीका केली. सुजय विखे म्हणाले, राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, अशावेळी फालतुगिरीमध्ये काही लोक इकडेतिकडे मोर्चे काढत आहेत. खरंतर त्यांनी बांधावर जायला हवे. जिल्ह्यातील लोकांनी ज्या खासदाराला निवडून दिले त्यांना विनंती आहे की, त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, दुष्काळाची परिस्थिती पहा, दुष्काळासाठी केंद्र सरकारकडे जाऊन काही मागणी करता येते का ते पहावे. परंतु खासदारांकडून रस्त्यावरील मोर्चा सोडून दुसरे काहीच अपेक्षित नाही.