कर्जतः राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार राहुल जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजेंद्र नागवडे या दोन साखर कारखानदारांसह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी आज, बुधवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. तसेच श्रीगोंदा तालुक्यात नव्या राजकारणाची नांदी होणार आहे.

माजी आमदार राहुल जगताप हे सहकारमहर्षी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. तर राजेंद्र नागवडे हे सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. जगताप गेले काही दिवसांपासून शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत मिळत होते. राजेंद्र नागवडे यांनी काँग्रेस, भाजप असा प्रवास करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. आता पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीत उडी घेतली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे म्हणाले, सहकारातील दोन मातब्बर नेते राजेंद्र नागवडे व राहुल जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्याला विकासाची वेगळी ताकद देण्यात येईल. दोघे एकमेकांच्या विरोधात लढले असले तरी अजित पवार यांच्या नेतृत्वात श्रीगोंदे तालुक्याच्या विकासासाठी ते एकत्र आले आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुढील महिन्यात श्रीगोंद्यात मेळावा घेण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, आनंद परांजपे, संजय तटकरे, सुरज चव्हाण, अशोक सावंत, भगवानराव पाचपुते आदींसह श्रीगोंद्यातील जगताप व नागवडे समर्थक उपस्थित होते.