अहिल्यानगर : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सत्ताधारी शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेने आज, मंगळवारी राहुरीमध्ये रास्तारोको आंदोलन केले. शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर सरसकट कर्जमाफी लागू झाली असती, असा दावाही यावेळी बोलताना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला.
शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी कोणत्याही अटी व शर्ती लागू करू नये, कृषीपंपाला दिवसा अखंड आठ तास वीजपुरवठा करावा, कांदा २५०० रुपये दराप्रमाणे खरेदी करावा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, उसाची प्रलंबित देयके शेतकऱ्यांना दिली जावीत, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले सन २०२४ च्या विधानसभा निवडणूक दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली मात्र आता कर्जमाफी करताना ज्या अटी व शर्ती लागू करण्यात आल्या, त्यातून १० टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही. साखर, कांद्याला निर्यातबंदी करून, कापूस आयात करून सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले, असाही आरोप त्यांनी केला.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर त्यांनी कोणत्याही अटी व शर्ती लागू न करता सरसकट कर्जमाफी केली असती कारण ते शेतकरी पुत्र आहेत, असा उल्लेख करत मोरे यांनी अप्रत्यक्षपणे भाजप व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आपला रोख व्यक्त केला.
आंदोलनात सचिन मसे, सुनील आढाव, विजय तोडमल, गोरक्षनाथ लोंढे, किशोर गाडे, योगेश सोनवणे, अमोल मोढे, शिवराम पुंड, संदीप खाडे, गजानन चव्हाण, डॉ. सचिन पवार तसेच शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी राहुरीतील अहिल्यानगर-मनमाड रस्ता अडवला. त्यामुळे काहीकाळ वाहतूक बंद पडली होती. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
