अहिल्यानगर: महसूल विभागाने नेवासा बुद्रुक परिसरातील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ७० तराफे जप्त करून त्यांचा पेटवून देऊन नाश केला. या कारवाईत सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. दोन दिवस ही मोहीम सुरू होती. प्रवरा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा व्यवसायात आता बिहार प्रांतातील मजूरांचा वापर वाळू तस्करांनी सुरु केलेला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेवासा महसूल विभागाने सकाळी सुरू केलेली ही कारवाई मध्यरात्रीनंतर थांबवण्यात आली. प्रवरा नदीपात्रात विशेष ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले. नेवासा शहर, नेवासा बुद्रुक ते चिंचवन बंधारा या दरम्यान प्रवरेच्या पात्रात ही मोहीम हाती घेण्यात आली. कारवाईदरम्यान वाळू उपशासाठी वापरले जाणारे ७० अवैध तराफे (चपू- थर्माकोलचे प्रचंड मोठ्या आकाराचे तराफे) जप्त करून नदीकाठावर आणण्यात आले व त्यांचा नाश करण्यात आला.

एका तराफ्याची अंदाजे किंमत ४० हजार रुपये मानली जाते. या मोहिमेत सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याचा अंदाज उपविभागीय अधिकारी पाटील यांनी व्यक्त केला आहे. नदीपात्रातील कारवाईसाठी श्रीरामपूर येथून विशेष बोट व पथकाची मदत घेण्यात आली. लाडमोड टेकडीपासून नदीत उतरून नेवासा बंधारा ते चिंचवन बंधारा या परिसरात ही धडक मोहीम राबवण्यात आली. प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे, निवासी नायब तहसीलदार बोरुडे यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

या कारवाईमुळे अवैध वाळू उपशाला काही प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा महसूल अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महसूल प्रशासनाने नदीपात्रातील हालचालींवर अधिक काटेकोर नजर ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. स्थानिक पातळीवर गस्त वाढवून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू तस्करी खपवून घेतली जाणार नसून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरुद्ध पुढे कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. मात्र अवैध वाळू उपशातील बिहारमधून आलेल्या मजुरांच्या सहभागामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नाकडेही लक्ष वेधले जात आहे.

मागील आठवड्यात महसूल विभागाने प्रवरा नदीपात्रत अशीच मोहीम राबवत सुमारे २५० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त केला होता. हा वाळू साठानंतर ३७ घरकुल लाभार्थींना बांधकामासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला होता.