अहिल्यानगर: अहिल्यानगर-पुणे या शिवशाही बसमध्ये एका हिंदू प्रवासी महिलेची वाचकाकडून छेड काढल्याची चित्रफित प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर कथित ‘ट्रॅव्हल जिहाद’ विरोधात सकल हिंदू समजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवारी कायनेटिक चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात, तापलेल्या रस्त्यावर महिलांसह नागरिक सहभागी झाले होते.
हिंदू प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या वाहकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार जगताप यांनी घेतली. सुमारे तासाभराने पोलिस अधिकाऱ्यांनी सबंधित वाहकावर गुन्हा दाखल केल्याची प्रत संग्राम जगताप यांना दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. नागरिकांनी दिलेल्या ‘जय श्रीराम….’, भारतमाता की जय, जो हिंदू हित बात करेगा, ‘वही देश पे राज करेगा..’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, आजपर्यंत लव्ह, लँड, व्होट जिहाद विरोधात आंदोलने केली. पण आता नाशिकमध्ये ‘आयटी जिहाद’ व अहिल्यानगरमध्ये ‘ट्रॅव्हल जिहाद’चे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे हिंदू महिला-भगिनींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या विरोधात महिला व नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. मुस्लीम समजाचे षडयंत्र महिलांनी समजून घ्यावे, वेळीच सावध व्हावे. हा समाज सातत्याने हिंदू समजावर अत्याचार करत आहे. आता हे सहन न करता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे.
नगरमध्ये जिहादी वृतींकडून असे वेगवेगळे प्रकार वाढत आहेत. हिंदू महिलांनी आत जागरूक झाले पाहिजे. ज्या बस, रिक्षा व गाडीने महिला प्रवास करत असतील त्या गाड्यांचे चालक व वाहक हे हिंदू आहेत की नाही याची खात्री करूनच त्या गाडीने प्रवास करा. या आधीही ज्या घटना घडल्या त्याविरोधात कडक कारवाईची मागणी शासनाकडे केली आहे. शासन त्यावर कारवाई करेलच. पण आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत हिंदू समाज एकवटल्यानेच बांगलादेशी जिहाद्यांचे काहीही चालले नाही. अशी एकजूट आता अंतर्गत मतभेद विसरून महाराष्ट्रात दाखवा.
यावेळी महापौर ज्योती गाडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी तसेच नगरसेवक, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
