मुंबई: अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर येथे सहा वर्षाच्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. याबाबत विरोधकांनी दिलेला स्थगत अध्यक्षांनी फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी सभागृहात चर्चा करण्यावरुन आजी-माजी अध्यक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अस्लम शेख आदी सदस्यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून सहा वर्षाच्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले. राज्यात महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का अशी विचारणा विरोधकांनी केली.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. संबंधित पोलीस अधीक्षक हे गुन्हेगारांना पकडण्याऐवजी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ते रायगडमध्ये असतानाचे त्यांचे ‘कर्तृत्व’ सर्वांना माहित आहे. जेव्हा रक्षकच भ्रष्ट होतात, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस वाढते आणि अशा क्रूर घटना घडतात, असा आरोप त्यांनी केला. गृहखात्याचा पोलिसांवर वचक राहिलेला नाही. राज्यात लहान मुलींच्या शोषणाच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे, मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे,अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार यांनी मांडलेल्या या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी या घटनेची दखल घेत या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन सभागृहात सविस्तर निवेदन करावे,असे आदेश सरकारला दिले.
अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव नाकारल्यामुळे आणि बोलू दिले जात नसल्याने विरोधी सदस्य संतप्त झाले होते. स्थगन प्रस्ताव हेच विरोधी पक्षाचे मोठे आयुध असते , प्रस्ताव नाकारले तरी काही सदस्यांना बोलू देण्याची परंपरा आहे असे भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितले. त्यावर आपण कोणतीही प्रथा परंपरा मोडत नाही, आपल्याला इतर बरेच कामकाज पार पाडायचे आहे.त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेणे आवश्यक असल्याचे सांगत अध्यक्षांनी अन्य सदस्यांची बोलू देण्याची मागणी फेटाळली. त्यावर नाराज झालेल्या नाना पटोले यांनी अध्यक्षांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतले. अध्यक्षांवर हेत्वारोप होत असल्याचा आरोप यावेळी अमित साटम यांनी केला. मी कोणतेही आरोप केले नाहीत, आपला स्थगन प्रस्ताव का नाकारला याची कारणे कळायला हवीत अशी मागणी नाना पटोले यांनी केली, त्यावर आपण सभागृहाचा अधिक वेळ घालवू इच्छित नाही असे सूनावत अध्यक्षांनी वादावर पडदा टाकला.
