अहिल्यानगर : उन्हाचा कहर वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उद्या, शनिवारपासून ते उन्हाळ्याची सुट्टी लागेपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज, शुक्रवारी जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो ‘ॲलर्ट’ जारी केला होता. त्यानंतर उष्माघातचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी शाळांच्या वेळा बदलाचा आदेश दिला आहे. शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना त्यांनी शिक्षण विभागाला केली आहे. शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहावे असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

गेल्या सुमारे आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला आहे. सकाळी नऊ वाजताच उन्हाचा चटका जाणवण्यास सुरुवात होते. त्यामुळे दुपारी साडेअकरा- बारानंतर रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागतो. विशेषतः सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचार पाच पर्यंत उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. वाढत्या उन्हामुळे ताक, उसाचा रस यांच्या ठेल्याभोवती गर्दी असते. रस्त्यावरील विक्रेते उन्हापासून बचाव करत व्यवसाय करतात. रात्री नागरिक उकाड्याने घामाघुम होत आहेत. त्यातच खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त ही झाले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत.