अहिल्यानगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत नगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी आज, शुक्रवारी राज्य सरकारने प्रसिद्ध केली. यामध्ये जिल्हा बँकेचे ६ हजार २६२ शेतकरी व राष्ट्रीयकृत- व्यापारी बँकांचे ३ हजार १४२ शेतकरी असे एकूण ९ हजार ४०४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी ग्रामपंचायत, सेवा सोसायटी, बँकांच्या शाखेत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
नगर जिल्ह्यात यापूर्वी कर्जमाफीच्या दोन यादीत १ लाख १५ हजार २१५ शेतकर्यांना १ हजार ११४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. सेवा संस्थांचे सचिव व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संपर्क साधून बँक खात्यांचे प्रमाणीकरण तत्काळ पूर्ण करावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. सरकारच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार ३१ मार्चपर्यंतचे शेतकऱ्यांची कर्जमाफीची सर्व रक्कम माफ होणार असल्याची माहितीही सहकार विभागाकडून देण्यात आली. तसेच १ एप्रिलपासूनचे ते आजच्या तारखेपर्यंतचे कसलेही व्याज शेतकऱ्यांकडून भरून न घेण्याबाबत सर्व बॅंकांच्या शाखाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कर्जमाफीची यादी ही ‘ओटीएस’ची नसल्याने बँकांनी यादीत नावे आलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांच्या वरची कसलीही रक्कम शेतकऱ्याला भरायला सांगू नये तसेच आधार प्रमाणीकरण हे पूर्णपणे मोफत असून याबाबत आपले सरकार सेवा केंद्र, सेतू चालकाने कसलेही शुल्क न घेण्याबाबत यापूर्वीच सेतू चालकांना कळवलेले आहे. उर्वरित शेतकऱ्यांची पुढील यादी देखील लवकरच शासनामार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीत नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण ३१ मार्च २०२६ च्या थकीत कर्ज रकमेची खात्री संस्था व बँकेत करून पूर्ण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर, जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी केले आहे.
कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील ३ लाख हजार ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांना आधार प्रमाणीकरणासाठी ही यादी उपलब्ध करून देण्यात आली. यात २४ जुलै रोजी १६.९६ लाख पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२.५८ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात आतापर्यंत १० हजार ११४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
‘हेअर कट’ धोरण
‘हेअर कट धोरणानुसार राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांमधील ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांचे कर्ज शासनाच्या ‘हेअर कट धोरणा’नुसार निरंक (शून्य) केले जाणार आहे. मृत, वयस्कर आणि बोटांचे ठसे न उमटणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी १९ ऑगस्टला विशेष मानक कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे, जेणेकरून कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही. जिल्हा बँकेचे ८० हजारांवर कर्जदार शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
