अहिल्यानगर: मुलीचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून आई, वडील व आजी अशा तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच तपासात हलगर्जीपणा करून दोषारोपपत्रात त्रुटी ठेवल्याच्या कारणावरून न्यायालयाने शेवगाव पोलीस ठाण्यातील तत्कालीन तीन पोलीस अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करून कारवाईचे आदेश गृह विभागाचे सचिव व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
वडील साईनाथ दिनकर गरड, आई छाया साईनाथ गरड व आजी पद्मावती दिनकर गरड (तीघे रा. शेकटे बुद्रुक, शेवगाव, अहिल्यानगर) या तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. खटल्यातील आणखी एक आरोपी मामाची न्यायालयाने मुक्तता केली. घटना घडली त्यावेळी छाया गरड शेकटे ग्रामपंचायतीची सरपंच होती व तीचा राजकीय दबदबा होता.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी या खटल्याचा निकाल आज, मंगळवारी दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियंता अनिल देवराम ढगे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक महेश जोशी व हवालदार बेडगे यांनी सहाय्य केले.
न्यायालयाने निकाल देताना गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल व सहायक निरीक्षक शेळके या तिघांसह ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी दोषारोपपत्राची छाननी केली, त्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध खातेनिहाय चौकशी करून कारवाईचे आदेश दिल्याची माहिती सरकारी वकील ढगे यांनी दिली.
मुलीच्या प्रेमसंबंधाची माहिती झाल्यानंतर, गावात इज्जत जाईल म्हणून तिच्या आई-वडील आजी व मामा या तिघांनी विवाहास नकार देत ७ ऑक्टोबर २०२२ रोजी मुलीचा मारहाण करून खून केला व त्याच रात्री तिच्या मृतदेहावर घरासमोर अंत्यसंस्कार करून जाळून टाकला व तेथील राख कुठेतरी फेकून देऊन पुरावा नष्ट केला अशी फिर्याद मुलीच्या प्रियकराने शेवगाव पोलिसांकडे दिली होती. त्यानुसार शेवगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. पीडित मुलाने स्वतःच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली असा आरोपींचा बचाव होता. खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले.
