अहिल्यानगर:आरोग्यास अपायकारक असल्याने केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या मांगुर माशांची वाहतूक होत असलेल्या साठ्यावर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ४ हजार किलो मांगुर मासे जप्त करण्याची कारवाई पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जप्त केलेले मांगुर मासे पश्चिम बंगालमधून मुंबईला पाठवले जाणार होते, असे तपासात निष्पन्न झाल्याची व चौघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.

बंदी घातलेल्या मांगुर माश्यांच्या वाहतुकीवर, साठ्यांवर यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र त्यास प्रतिबंध बसलेला नाही. अहिल्यानगर-मनमाड रस्त्याने पश्चिम बंगालमधून मांगुर मासे घेऊन निघालेली मालवाहतूक मोटार (डब्ल्यूबी २५ एम ५०२३यु) मुंबईकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली.

या पथकाने शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत गलांडे, उपनिरीक्षक सागर काळे यांच्या समवेत निमगाव बाह्यवळण रस्त्यावर सापळा रचून संशयित मालमत्ता ताब्यात घेतली.तपासणीमध्ये मालमोटारीच्या केबिनमध्ये ४ हजार‌ किलो मांगुर माशांचा साठा आढळला. यासंदर्भात स्वपन नियम डे (३६), मकबूल रौफ सरदार (३१), कुतुब आयुब मंडल (३५) व मृत्युंजय मुकुंद विश्वास (२७, सर्व पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यानंतर पथकाने पोलिसांनी ठाणे येथील मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क करून ताब्यात घेतलेल्या माशांची तपासणी केली व ते प्रतिबंधित मांगूरर मासे असल्याचा अभिप्राय पाटेकर यांनी दिला.जप्त करण्यात आलेल्या ४ हजार किलो प्रतिबंधित माशांची किंमत ४ लाख रुपये आहे. याबरोबरच २५ लाख रुपये किमतीची मालमोटर असा एकूण २९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेले प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचा नाश करण्यात आला. या संदर्भात मत्स्यविकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दीपक मेढे, अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, सतीश भवर, उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने या कारवाईमध्ये भाग घेतला. पोलिसांनी प्रतिबंधित मांगुर माशांच्या साठ्यांवर यापूर्वीही कारवाई केली आहे.