अहिल्यानगर : शहरात काल, बुधवारी रात्री व आज, गुरुवारी सायंकाळी घोडेगाव (ता. नेवासा) येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. घोडेगाव येथे टोळीयुद्ध झाले. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. नगरमधील घटनेत एकजण जखमी झाला. नगरमधील घटनेला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.
घोडेगावमधील घटना जनावराच्या बाजाराततळावरील वाहनतळाच्या ठेकेदारीच्या वादातून घडल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली. नितीन शिरसाठ (वय ४०, रा.घोडेगाव, नेवासा ) असे मृताचे नाव आहे तर विरुद्ध बाजूचा संजय फुलमाळी असे जखमीचे नाव आहे. संजय फुलमाळी याला अधिक उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
घोडेगाव येथील जनावराच्या बाजारातील वाहनतळाच्या ठेक्यावरून दोन टोळ्यांमध्ये वाद निर्माण झालेले आहेत. या वादातूनच गोळीबाराची घटना घडली. नितीन शिरसाठ त्याच्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आला होता. त्याचवेळी शिरसाठ व गुलाब फुलमाळी या दोघांचे समर्थक एकमेकांसमोर आले व त्यांनी परस्परांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.
नितीन शिरसाठ याचा अहिल्यानगरमधील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. याच रुग्णालयात जखमी सुरज फुलमाळी याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, नंतर अधिक उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी या घटने संदर्भात दोघांना ताब्यात घेतली आहे.
अहिल्यानगर शहरात गोळीबार
अहिल्यानगर शहरात कोठला परिसरात बुधवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास झालेल्या गोळीबारामध्ये अबरार मुख्तार शेख (वय २४, रा. प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार) जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
अबरार शेख याचे शहरातील पुणे बसस्थानक परिसरात ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहे. महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीतील वादातून त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी दोन लाखांची ‘ऑफर’ देत त्याच्यावर दबाव आणला गेला होता. मात्र त्याने नकार दिल्यानंतर कोठला भागात भररस्त्यात त्याच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये तो जखमी झाला.
अबरार शेख हा त्याचा मित्र अभिषेक पवार याच्या दुचाकीवर बसून मुकुंदनगरकडे जात होता. दोघेजण कोठला भागातील राज चेंबर समोर आले असता एका रिक्षाने त्यांची दुचाकी अडवली. रिक्षातून उतरलेल्या एकाजवळ गावठी कट्टा पाहून अबरार याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आला. गोळी त्याच्या कमरेच्या खाली उजव्या बाजूला लागली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले.
नगरच्या रुग्णालयातही धुमश्चक्री
घोडेगाव येथील गोळीबारातील जखमी नितीन शिरसाठ व संजय फुलमाळी या दोघांना अहिल्यानगर शहराच्या तारकपूर भागातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथेही दोघांच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री उडाली. नगरच्या घटनेतील जखमी अबरार शेख हा सुद्धा याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या पोलिसांनी घोडेगावमधील दोन्ही बाजूच्या समर्थकांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने मोठा बंदोबस्त मागवण्यात आला. या घटनेने रुग्णालयातील दाखल रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भांबळ आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
नेवासा तालुक्यात महिनाभरात तीनवेळा गोळीबार
घोडेगावसह नेवासा तालुक्यातील गोळीबाराची ही महिनाभरातील तिसरी घटना आहे. तीन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला. यापूर्वी चांदा येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत शाहिद शेख याचा मृत्यू झाला तर अंमळनेर येथील गोळीबारात रोहित शिवाजी दरंदले हा जखमी झाला. आजच्या घटनेत नितीन शिरसाठ याचा मृत्यू झाला.
