अहिल्यानगर : श्रीरामपूरहून खंडाळाच्या दिशेने गणपती दर्शनासाठी जाणारी मोटार व समोरून येत असलेल्या मालवाहतूक मोटारीची समोरासमोर धडकेत चौघांचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. यात एक महिला अत्यवस्थ आहे तसेच दोन लहान मुलांचा समावेश आहे.
आज, बुधवारी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील एसटी कार्यशाळेजवळ, संगमनेर रस्त्यावर हा अपघात झाला. मृत चौघेही एकाच कुटुंबातील आहेत. हे चव्हाण कुटुंब श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध ‘संतोषी वडापाव केंद्र’चे संचालक अशोक व रमेश चव्हाण यांचे कुटुंबीय आहेत. मृतांची नावे पुढीलप्रमाणे- प्रशांत रमेश चव्हाण (वय २४), संगीता अनिल चव्हाण (वय ४०), सिद्धार्थ सुनील चव्हाण ( वय १६) व ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय २६, सर्व रा. सरस्वती वसाहत, श्रीरामपूर).
जखमींची नावे- सारिका अनिल चव्हाण ( वय ३०), रुद्र अशोक चव्हाण (वय ६), व ऋत्वी अशोक चव्हाण ( वय ३.५ वर्षे सर्व रा. श्रीरामपूर).
श्रीरामपूरहून खंडाळाच्या दिशेने जाणाऱ्या चव्हाण कुटुंबाच्या मोटारीला (एमएच ०३ एएफ ००५४) समोरून येत असलेल्या मालवाहतूक मोटारीची (एचआर ६७ ई ३००२) धडक बसली. त्यात चौघांचा मृत्यू झाला तर ३ लहान गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी तिघांना मृत घोषित करण्यात आले. चव्हाण कुटुंबीयांनी अत्यवस्थ ऐश्वर्या चव्हाण वगळता अन्य जखमींना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले, नंतर उपचार सुरू असताना ऐश्वर्या यांचा मृत्यू झाला.श तर ऋत्वी व रुद्र हे लहान मुले गंभीर जखमीआहेत.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. गर्दीला पांगवून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यात आली. शहर पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वाहनांचा पंचनामा केला आहे. अपघातात चव्हाण कुटुंबीयांच्या मोटारीचा चक्काचूर झाला.
काल, मंगळवारी पहाटे श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव शिवारात अहिल्यानगर-दौंड महामार्गावर झालेल्या अपघातात मोटारीतील चौघांचा मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. त्यानंतर आज पुन्हा जिल्ह्यात श्रीरामपूरमध्ये अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला.

