अहिल्यानगर: श्रीरामपूर शहर व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेलापूरमध्ये छापा टाकून १३ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा व ५ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण १८ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात श्रीरामपूरमध्ये केली होती, आता जिल्हा पोलीस अध्यक्ष अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारताच ठोस कारवाईची सुरुवातही श्रीरामपूरमधून केली आहे.
बेलापुरातील साई पेट्रोलपंप जवळील एका घरासमोर उभे असलेल्या टेम्पो (क्रमांक एमएच ०७ एफ ३१००) तपासणी केली असता त्यात गोवा कंपनीचा, राज्यात बंदी असलेला गुटखा आढळून आला. कारवाईदरम्यान दोघेजण घटनास्थळावरून पळून गेले, इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली. उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बेलापूर परिसरात यापूर्वीही गुटखा साठवणुकीच्या व विक्रीच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनानेही अशा कारवाई केल्या आहेत. मात्र आता पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रथमच ठोस कारवाई झाली आहे.