अहिल्यानगर: जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण अभियानासाठी (एसआयआर) केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीच्या, निम्म्या कालावधीत आत्तापर्यंत ३८ लाख १० हजार १०२ पैकी १५ लाख ४२ हजार ६५० (४०.४९ टक्के ) मतदारांची पडताळणी (डिजिटायझेशन) आज, बुधवारपर्यंत झाली आहे. आता उर्वरित निम्म्या कालावधीत तब्बल २२ लाख ६७ हजार ४५२ मतदारांची पडताळणी होणे बाकी आहे.

‘एसआयआर’साठी ३८३० बीएलओ जिल्ह्यात नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी ४२२ पर्यवेक्षक आहेत. २९ जुलैपासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. तो ३० जूनपर्यंत चालेल. त्यासाठी बीएलओ घरोघर भेट देऊन गणना प्रपत्र वितरित करत आहेत. गणना प्रपत्र वितरणाचे काम जवळपास (९६.१६ टक्के ) आटोपलेले आहे. अद्याप १ लाख ७१ हजार ३५८ मतदारांना प्रपत्र वितरित करण्याचे काम बाकी आहे. त्यामध्ये बहुसंख्य स्थलांतरित, निधन झालेले आहेत. ५ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर ९ सप्टेंबर पर्यंत हरकती व दावे दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल.

वितरीत केलेले गणना प्रपत्र ३० जूनपर्यंत मतदारांकडून भरून घेऊन बीएलओ यांनी त्याचे ‘डिजिटायझेशन’ करावयाचे आहे. हे काम ४०.४९ टक्के झालेले आहे. मतदारांचे डिजिटायझेशन पडताळणी झालेले मतदारसंघनिहाय काम पुढीलप्रमाणे- अकोले ३८.७२ टक्के, संगमनेर ३७.८१, शिर्डी ३९.९८, कोपरगाव ४९.९१, श्रीरामपूर ३७.२८, नेवासा ३२.६९, शेवगाव ४१.५०, राहुरी ३७.५६, पारनेर ४५.२१, अहिलानगर शहर ३७.०४, श्रीगोंदा ३६.२६ टक्के व कर्जत -जामखेड ५०.०६ टक्के.

११ ‘बीएलओ’चे १०० टक्के काम पूर्ण

आपल्या केंद्रामध्ये गणना प्रपत्र १०० टक्के वितरित करून त्याचे डिजिटायझेशन केलेल्या बीएलओ यांची नावे पुढीलप्रमाणे- सविता नारायण दरंदले (नेवासा), महेश चंद्रकांत होरणे (शेवगाव), रमेश दिगंबर कर्पे (श्रीगोंदे), अनिता पांडुरंग टिपगुडे, संगीता अशोक खेडकर, प्रकाश भाऊसाहेब नेटके, रामहरी राजेंद्र बांगर, महादेव गोरख हजारे, किरण सुधाकर माने, संदीप गेना घोडके व अमोल दिनकर उढाणे (सर्व कर्जत- जामखेड). शंभर टक्के काम पूर्ण केलेल्या या ११ बीएलओ यांचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सन्मान केला.

मुदतीत पूर्ण होईल

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत एसआयआर कार्यक्रम पूर्ण होईल यासाठी प्रयत्न आहेत. पात्र मतदार वंचित राहणार नाही व अपात्र मतदाराचा मतदार यादीत समावेश होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. कार्यक्रमाच्या पाहणीसाठी आपण काही ठिकाणी भेटी दिल्या आहेत. राज्यात नगर जिल्ह्याचे काम उल्लेखनीय ठरत आहे त्याबद्दल सर्व बीएलओ यांचे सहकार्य लाभत आहे. -सुनील गाढे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा.

राजकीय पक्षाकडून १०४८५ सहाय्यक; सर्वाधिक भाजपचे

‘एसआयआर’साठी नियुक्त केलेल्या बीएलओ यांच्या सहायासाठी राजकीय पक्षांनी बीएलए नियुक्त केले आहेत. अशी संख्या १० हजार ४८५ आहे. त्यामध्ये सर्वाधिक भाजपचे ३१७८, अजित पवार गटाचे २२७४, शिंदे गटाचे १७४६, काँग्रेसने १३३५, शरद पवार गटाकडून ४२४, ठाकरे गटाकडून १२०४, मनसेकडून २४, बसपकडून १५ तर आपकडून ८ सहायक नियुक्त करण्यात आले आहेत.

अडथळे

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रश्न जाणवत आहे. त्यामुळेही डिजिटायझेशन करताना बंधने येतात. काही ठिकाणी मतदार बाहेरगावी गेलेले, स्थलांतरित झालेले आढळतात. अपवादात्मक बीएलओ यांचे निधन, आजारपण यामुळेही बीएलओ पुन्हा नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण द्यावे लागले. त्यात कालापव्यय झाला.