अहिल्यानगर: बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या सिस्पे, इनफिनाईट बिकन व इतर कंपन्यांच्या आर्थिक घोटाळा गुन्ह्यातील प्रमुख संशयित आरोपी राहुल शामराव काळोखे याला मुंबई विमानतळावर अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस पथक अहिल्यानगरला घेऊन येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी या माहितीला दुजोरा दिला. दरम्यान खासदार नीलेश लंके यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राहुल काळोखे याला फिजी देशामध्ये इंटरपोलने अटक करून भारतात प्रत्यार्पण केले.

या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यांत सिस्पे, इनफिनाईट बिकन व इतर कंपन्यांविरोधात एकूण चार गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचा एकत्रित तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे करीत आहेत. तपासादरम्यान संशयित आरोपींसह कंपन्यांची सुमारे ११४ कोटी ९३ लाख रूपयांच्या मालमत्ता जप्तीच्या प्रस्तावाला एमपीआयडी कायद्यान्वये (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियम) राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. याशिवाय आणखी मालमत्तांचा समावेश असलेला पुरवणी प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरू आहे. याचबरोबर फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविण्याचे कामही सुरू आहे.

या प्रकरणात यापूर्वी अनेक संचालक आणि एजंटांना अटक करण्यात आली मात्र, काही प्रमुख संशयित आरोपी देशाबाहेर पसार झाले होते. त्यांच्या विरोधात इंटरपोलमार्फत ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करण्यात आली. त्यांना भारतात परत आणण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने सीबीआय, परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि इंटरपोल यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना पहिले मोठे यश मिळाले. रेड कॉर्नर बजावलेला आरोपी राहुल काळोखे याला फिजीमध्ये शोधून तेथील स्थानिक अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याचे भारतात प्रत्यर्पण करण्यात आले. गुरूवारी त्याला भारतात आणण्यात आले असून, आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई विमानतळावर त्याचा ताबा घेतला.

गुंतवणूकदारांची फसवणूक

राहुल काळोखे हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अगस्ती मिश्रा याचा निकटवर्तीय आहे. त्याने आपल्या सहकार्‍यांसह संगनमत करून गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.