अहिल्यानगर: बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड असले तरी एमआयडीसीचा विस्तार होत नसल्याने राज्य सरकारच्या किमान कौशल्य विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या रोजगार मेळाव्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. कौशल्य विकास विभागाकडे १४ हजार ५४७ बेरोजगारांनी नोंदणी केली. या विभागाने गेल्या वर्षभरात पाच रोजगार मेळावे आयोजित केले. त्यातून कंपन्यांनी १८३३ रिक्त पदे कळवली होती, प्रत्यक्षात मेळाव्यासाठी केवळ १११७ उमेदवार उपस्थित राहिले आणि २५५ जणांची निवड झाली आहे.

अहिल्यानगरच्या एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या, कारखान्याच्या गेटवर टर्नर, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर पाहिजे असलेल्या फलक लटकवलेले दिसतात, असे असतानाही त्यांच्यासाठीच आयोजित केल्या जाणाऱ्या रोजगार मेळाव्याकडे मात्र हे बेरोजगार पाठ फिरवताना आढळत आहेत. येथील एमआयडीसीमध्ये मिळणारे वेतन, कामाचे स्वरूप यापेक्षा मुंबई-पुणे किंवा अन्य शहरात मिळणारे वेतन, कामाचे स्वरूप, सुविधा, सवलती यामुळेही येथील मेळाव्यांकडे पाठ फिरवली जात असल्याचे सांगितले जाते.

बेरोजगार तरुण आणि कंपन्यांना हवे असणारे कर्मचारी-कामगार यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित केले जातात. प्रामुख्याने दहावी, बारावी, उत्तीर्ण आयटीआय प्रशिक्षित व पदवीधरांसाठी हे मेळावे आयोजित केले जातात.

एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत येथील कौशल्य विकास विभागाने ५ रोजगार मेळावे आयोजित केले. त्याला जिल्ह्यातीलच ४६ कंपन्यांनी प्रतिसाद देत १८३३ रिक्त पदे उपलब्ध असल्याचे सांगत मेळाव्यासाठी मागणी नोंदवली. मात्र या मेळाव्यांना १११७ उमेदवार उपस्थित राहिले. पहिल्या चाचणीत ४७१ जणांची निवड करण्यात आली. अंतिम चाचणीत २५५ जणांना नियुक्ती पत्र मिळाली.

कौशल्य विकास विभागाकडे १४ हजार ५४७ उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यामध्ये ९८१८ पुरुष तर ४७२९ महिला आहेत. या उमेदवारांना कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाइन कंपन्यांकडील रिक्त पदांची माहिती उपलब्ध करण्यात येते. त्यासाठी उमेदवाराने वर्षभरात एक किमान एकदा तरी लॉगइन करणे आवश्यक असते.

अपंग उमेदवारांसाठी स्वतंत्र मेळावा

येथील कौशल्य विकास विभागाने एक रोजगार मेळावा केवळ अपंग उमेदवारांसाठी आयोजित करण्याचे कौशल्य दाखवले. यामध्ये ८ कंपन्यांनी १८८ रिक्त पदे कळवली. त्यासाठी १५५ अपंग उमेदवारांनी हजेरी लावली. ७८ जणांची प्राथमिक चाचणीत निवड करण्यात आली तर अंतिम चाचणीत ५९ जणांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत.

उमेदवार व कंपन्या एकाच व्यासपीठावर

ज्या उमेदवारांना अनुभव नाही व ज्या आस्थापनांना उमेदवार हवे आहेत, अशांना एकाच व्यासपीठावर संधी देण्याचे काम रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होते. उमेदवारांसाठी ही संधी आहे. त्यांनी मेळाव्यांना प्रतिसाद देऊन अनुभव घ्यावा व नंतर त्या अनुभवाच्या बळावर संधी शोधाव्यात. कौशल्य विकास विभागाने वर्षभरात पाच रोजगार मेळावे आयोजित केले. त्यामध्ये अपंग उमेदवारांसाठी एक स्वतंत्र मेळावा झाला. -रवीकुमार पंतम, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

एमआयडीसीचा विस्तार हवा

एमआयडीसीच्या विस्ताराअभावी मोठ्या कंपन्यांची येथे प्रतीक्षा आहे. बेरोजगारीचे प्रमाण मोठे असताना आणि कंपन्यांच्या बाहेर कर्मचारी हवे असल्याचे फलक लागले असतानाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. उमेदवारांना कष्टाचे काम नको आहे. अधिक वेतनाचीही त्यांची अपेक्षा असते. अनेकदा कामाचे स्वरूप कळल्यानंतर उमेदवार नोकरी सोडून जातात. -जयद्रथ खकाळ, अध्यक्ष ‘आमी’ उद्योजक संघटना.