अहिल्यानगर: राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या भूसंपादनाच्या नुकसान भरपाईची मंजूर झालेली रक्कम मिळवून देण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे-पारनेर उपविभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे तर दुसरा कर्मचारी फरार आहे.

श्रीगोंदे-पारनेर उपविभागीय कार्यालय अहिल्यानगर शहरात, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आहे. तेथील महसूल सहाय्यक मंगेश विजय ढुमणे व कंत्राटी कर्मचारी अमोल कानिफनाथ खामकर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ढुमणे याला अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी दिली.

श्रीगोंदे तालुक्यातील जंगलेवाडी येथील तक्रारदाराची गट क्रमांक १३ मधील १४३ गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ मध्ये रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी भूसंपादन केलेली आहे. या शेतजमिनीच्या नुकसान भरपाईची १ कोटी ४७ लाखांची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. ही रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने महसूल सहाय्यक मंगेश ढुमणे व कंत्राटी कर्मचारी अमोल खामकर यांची भेट घेतली. तेव्हा दोघांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.

त्यानंतर ४ मे रोजी ढुमणे याने तक्रारदाराला व्हाट्सअप कॉल करून १ लाख २० हजार रुपये लाचेची मागणी करून, जर पैसे दिले तर फंड ट्रान्सफर ऑर्डर लगेच हातात देतो, फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट करण्यासाठी ‘प्रांत साहेबांना’ पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केल्याची तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली व दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्यासह पोलिस अंमलदार गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर यांनी ही कारवाई केली.

राष्ट्रीय महामार्गाचे अनेक प्रकल्प जिल्ह्यात सुरू आहेत. त्यासाठी झालेल्या भूसंपादनाच्या भरपाईची रक्कम मंजूर झाली, मात्र संबंधित जमीन मालकाला ती प्रत्यक्षात मिळाली नाही, अशी अनेक प्रकरणे सध्या जिल्ह्यात प्रलंबित आहेत. रक्कम मिळण्यासाठी संबंधित नागरिकांना महसूल कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात.