अहिल्यानगर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत एकाही साखर कारखानदाराने भाव जाहीर न केल्याने अखेर शेतकरी संघटनांनी ४ हजार रुपये दराची मागणी करत सोमवारपर्यंत (दि. ९) मुदत दिली आहे, अन्यथा नगर- मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन जाहीर केले आहे. कारखानदारांनाही रस्त्यावर फिरू देणार नाही, असाही इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. मात्र अद्याप साखर कारखानदारांनी यंदाच्या गाळप ऊसाला भाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ आहेत. याशिवाय इतरही प्रश्नांसाठी संघटनांनी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमका सुदर्शन, उपप्रादेशिक साखर संचालक गणेश पुरी, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उपमहापौर धनंजय जाधव तसेच साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. पालकमंत्री विखे यांनी ऊसदराचा प्रश्न संचालक मंडळाच्या बैठकीपुढे मांडून सोमवारपूर्वी भाव जाहीर करावा, अशी सूचना केली. मात्र भाव जर ४ हजार रुपयांपेक्षा कमी निघाला तर आम्ही आंदोलन करणार असा इशारा शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले. गाळप सुरू होवून अनेक दिवसांचा कालावधी लोटला. ऊसाचे पेमेंट १४ दिवसात देण्याचे बंधन असूनही पैसे मिळालेले नाहीत, त्यावर १५ टक्के व्याज मिळावे यासह उसाच्या वजनात काटेमारी केली जाते, वाहतूक व तोडणी दर निश्चित होत नाही. मागील देयके थकित आहेत, ते पैसे मिळावेत. उसाच्या पेमेंटमधून कर्ज हप्त्याची कपात करू नये आदी मागण्या संघटनांचे पदाधिकारी रावसाहेब लवांडे, रवी मोरे, रमेश कचरे, बाळासाहेब फटांगरे, अभिजीत पोटे, प्रशांत देवढे आदींनी मांडल्या.

जिल्हा बँकेच्या धोरणामुळे घोडे अडले

जिल्हा बँकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहे, प्रशासक साखर कारखान्यांना किती वेळ उचल देणार याचा निर्णय घेत नाहीत. संचालक मंडळ अस्तित्वात आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे त्यां सांगत आहेत. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर धोरण ठरवले जाईल त्यानंतर कारखान्यांना बँकेकडून किती उचल मिळेल हे स्पष्ट होईल, त्यानंतर किती दर गाळपासाठी देता येईल हे कारखाने ठरवतील, असे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी सांगितले. मात्र त्यांची ही भूमिका शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अमान्य केली. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांची निवड १२ किंवा १३ नोव्हेंबरला होण्याची शक्यता व्यक्त केली.

जिल्हा बँकेसारखेच ऊस दरासाठी एकत्र या

जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एकत्र येऊन जिल्हा बँक बिनविरोध घडवण्याचा प्रयत्न केला. काही जागा बिनविरोध केल्या. त्याचप्रमाणे ऊसदर जाहीर करण्यासाठी टोलवाटोलवी न करता एकत्र यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. गेल्या वर्षी मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखालील विखे कारखान्याने सर्वात आधी भाव जाहीर करून कोंडी फोडली होती. यंदाही त्यांनी भाव जाहीर करून कोंडी फोडावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

काटे मारी रोखण्यासाठी पथके

अनेक साखर कारखान्यांच्या वजनमापात तफावत आढळते, काटेमारी केली जाते, अशा तक्रारीही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. कारखान्याचे वजनमापे तपासण्यासाठी तहसीलदारांची भरारी पथके कार्यान्वित केले जातील, त्यामध्ये संबंधित तालुक्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचाही पथकात समावेश केला जाईल, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.