अहिल्यानगर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदा ऊसाला प्रतिटन ५ हजार रू. भाव द्यावा, नाहीतर सरकारने शेतकर्‍यांना प्रतिटन एक हजार रू. अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आज, सोमवारी गाळप हंगामातील ऊस दरासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत केली. मात्र, बैठकीत कारखाना प्रतिनिधींनी ऊसाला किती भाव देणार, याची ठोस घोषणा न केल्याने संतप्त शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी भाव जाहीर होईपर्यंत कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी केली.

ऊसदर, वाहतूक, वजनकाटे आदी विविध प्रश्‍नांवर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर कारखाना व शेतकरी संघटना प्रतिनिधींची समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, प्रादेशिक सहसंचालक गणेश पुरी, उपसंचालक संजय गोंदे, वजनमापे उपनियंत्रक अधिकारी रमेश दराडे, विशेष लेखापरिक्षक संतोष वाकचौरे व सतीष पोकळे तसेच शेतकरी संघटनेचे अभिजीत पोटे, रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगरे, मच्छिंद्र आरले आदी उपस्थित होते.

बैठकीची पूर्वसूचना प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने काही शेतकरी संघटनांना दिली नसल्याने उपस्थित पदाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक अथवा व्यवस्थापकीय संचालक बैठकीला उपस्थित नसल्यानेही संघटनांनी आक्षेप घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच बैठक घ्यावी, सध्याची बैठक रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी १५ ऑक्टोबरपर्यंत रजेवर असल्याचे उपजिल्हाधिकारी दळवी यांनी स्पष्ट केल्यानंतर बैठक सुरू करण्यात आली.

दुष्काळी परिस्थिती, ऊस उत्पादनाचा वाढति खर्च, साखरेला मिळालेला चांगला दर यामुळे यंदाच्या गाळप हंगामात शेतकर्‍यांना प्रतिटन ५ हजार रूपये भाव मिळावा अशी मागणी शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केली. बैठकीला उपस्थित कारखाना प्रतिनिधींनी प्रतिटन भाव लगेच जाहीर करणे शक्य नसल्याचे सांगितले. संचालक मंडळाच्या बैठकीत ऊसदराबाबत चर्चा केल्यानंतर निर्णय कळवू असे त्यांनी सांगितले.

यामुळे शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले. भाव जाहीर न करता कारखाने सुरू करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. यावर प्रादेशिक सहसंचालक पुरी यांनी शेतकरी संघटनांच्या मागणीचा योग्य विचार करण्याचे आश्‍वासन दिले.

कुकडी सहकारी साखर कारखान्याने सन २०२३ च्या गाळप हंगामातील प्रतिटन ७११ रूपये थकीत पेमेंट दिले नसून अनेक वाहतूकदारांचे पैसे थकीत आहे. आता थकीत कर्जापोटी जिल्हा बँकेकडून कारखाना जप्त केल्याने आमच्या पैशाची हमी कोण घेणार यावरून शेतकरी संघटना, वाहतूकदार आक्रमक झाले. मात्र, बैठकीत ठोस निर्णय झाला नाही.

दुसऱ्या पेमेंटचा विषय अनिर्णित

मागील ऊस गाळप हंगामातील पहिले पेमेंट शेतकर्‍यांना मिळाले. मात्र, त्यानंतर साखरेला चांगला दर मिळाल्याने शेतकर्‍यांना प्रतिटन ५२५ रू. प्रमाणे दुसरे पेमेंट द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली. कारखाना प्रतिनिधींनी साखरेचे दर वाढले असले तरी वाढीव दराने खरेदी करण्याचे व्यापार्‍यांनी मान्य करूनही प्रत्यक्षात खरेदी केली नाही, त्यामुळे कारखान्यांना अपेक्षित फायदा झाला नसल्याचा दावा केला. या स्पष्टीकरणावर शेतकरी संघटना पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली.