अहिल्यानगर: अवकाळी पाऊस व गारपीटीने गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०३ गावांमधील १२ हजार ९९९ शेतकर्यांच्या ८ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, संगमनेर, राहाता या आठ तालुक्यांना पावसू झोडपले. काही ठिकाणी वादळी वार्यासह गारपीट झाली.
गारपीट, पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे कांदा, मका, गहू, डाळिंब, द्राक्षे, हरभरा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. बुधवारी राहुरी, नेवासा, राहाता, अकोले, नगर व पाथर्डी या सहा तालुक्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. पारनेर, राहुरी, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली होती. गुरुवारी सायंकाळी जोरदार वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी नगर, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर, नेवासा या तालुक्यात गारपीट झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, डाळींब, टरबूज या फळपिकांसह गहू, हरभरा आणि चारा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. यावेळी वादळी वार्यामुळे पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी काढणीला आलेले गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून चार पिक असणारी मका पिक आडवे झाले आहे.
बुधवारी सहा तालुक्यातील ४१ गावातील ७ हजार ३५२ शेतकर्यांच्या ३.५ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला. त्यानंतर पुन्हा काल, गुरुवारी सांयकाळी झालेल्या पावसामुळे तालुकानिहाय नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. पारनेर तालुक्यातील २४ गावातील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक ३ हजार २०९ हेक्टरवरील ५ हजार ६९२ शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील ८ गावातील ५६ शेतकर्यांचे ३४ टक्क्यांपेक्षा अधिक २७ हेक्टर क्षेत्राचे, कर्जत तालुक्यातील ३ गावातील ५.१ हेक्टरवरील ५ शेतकर्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक तर श्रीरामपूर तालुक्यात ३२ गावांमधील १ हजार ५६ हेक्टरवरील १ हजार ६०९ शेतकर्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले.
तसेच नेवासा तालुक्यातील १५ गावातील ४५२ हेक्टरवरील ६६० शेतकर्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक आणि राहाता तालुक्यातील १७ गावातील ८७५ शेतकर्यांचे ५४६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. संगमनेरमधली २ गावतील १८० शेतकर्यांचे १२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
