अहिल्यानगर: जिल्ह्यात काल, सोमवारी सांयकाळी व रात्री झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे ९ तालुक्यातील २०३ गावे बाधित झाली आहेत. या तालुक्यातील २१ हजार ५६४ शेतकर्यांचचे १० हजार ८७८ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार आढळले आहे. गहू, कांदा, मका, टरबुज, आंबा, द्राक्षे आदी पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडून २ व्यक्तींसह १० जनावरे दगावली आहेत.
गेल्यावर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी कसाबसा सावरत असतांना गेल्या दिड. १९ मार्चपासून जिल्ह्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने वेळोवेळी शेती पिकांचे नुकसान सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या, बुधवारी व परवा, गुरुवारी जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे
गेल्यावर्षी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना अतिवृष्टीने चांगले झोडपून काढले होते. त्यावेळी खरीपाचे मोठे नुकसान शेतकर्यांना सहन करावे लागले. खरीप वाया गेल्याने आता रब्बी तरी हाताशी लागेल, अशी आशा शेतकर्यांची होती. पण अवकाळीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावून घेतला आहे.
काल झालेली गारपीट व पावसाने सर्वाधिक नुकसान अकोले तालुक्याचे झाले. ७४ गावांमधील ९ हजार ६२२ शेतकर्यांचे ४ हजार ४० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. त्याखालोखाल श्रीरामपूर तालुक्यात ४७ गावे बाधित झाले असून २ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन ४ हजार ८६ शेतकर्यांना फटका बसला आहे. नेवासा तालुक्यातील ३७ गावामधील ४ हजार ११२ शेतकर्यांचे २ हजार ३६५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यात १२ गावे बाधित झाले असून २ हजार १०६ शेतकर्यांचे १ हजार २१७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. राहाता तालुक्यात १५ गावामधील ९६५ शेतकर्यांचे ६२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
शेवगाव तालुक्यातील ८ गावांमधील ५२५ शेतकर्यांचे २४८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यात १ गावांतील ४ शेतकर्यांचे २ हेक्टर क्षेत्राचे तर कर्जत तालुक्यात २ गावांतील ४ शेतकर्यांचे ३.२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेे. कोपरगाव तालुक्यात ७ गावे बाधित झाले असून १४० शेतकर्यांचे ४८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात ३३ टक्केपेक्षा कमी २ हजार २४४ हेक्टर क्षेत्र असून ४ हजार ४३४ शेतकरी संख्या आहे. तर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान १७ हजार १३० शेतकर्यांचे ८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
२३ घरांची पडझड
जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसात पाथर्डी आणि राहाता तालुक्यातून प्रत्येकी एक असे दोघांचा वीज पडून मृत्यू झाला तर राहात्यात एक जखमी झालेला आहे. राहाता तालुक्यात ९ मोठी जनावरे तर राहुरीत १ असे १० मोठी जनावरे मृत्यूमुखी पडली तसेच १२ घरांची अंशतः: पडझड झाली. यात नेवासा ३, पारनेर १, पाथर्डी ४, राहाता १२ अशा २४ घरांची पडझड, संगमनेर तालुक्यात सहा ठिकाणी जनावरांचे गोठे पडले आहेत.
तातडीने पंचनामे करा- राधाकृष्ण विखे
अवकाळी पावसाने शेती पीकांचे तसेच नागरीकांच्या झालेल्या अन्य नूकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल व कृषी विभागाने तातडीने सुरू करावेत, नूकसानग्रस्तांना स्थायी आदेशाप्रमाणे मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही मंत्री विखे यांनी दिली.
