अहिल्यानगर : जिल्ह्यातील अनेक भागांना वादळी वाऱ्यासह झालेला जोरदार पाऊस व गारपिटीचा पुन्हा एकदा फटका बसला. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार गेल्या तीन दिवसात अहिल्यानगर, अकोले व संगमनेर तालुक्यातील १२ गावांमधील २७०३ शेतकऱ्यांच्या ११०४ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने आज, सोमवारी व उद्या, मंगळवारी विजांच्या कडकडाटासह वादळ व गारपीटीची शक्यता व्यक्त करत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता तसेच १ व २ एप्रिललाही ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. दरम्यान काल, रविवारी व आज जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व जोरदार पाऊस झाला. दहा दिवसांपूर्वीच जिल्ह्यात गारपीट व वादळी पावसाचा १०३ गावांना फटका बसला होता. त्यावेळी १३ हजारांवर शेतकऱ्यांचे ८ हजार ९१ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे अहवाल कृषी विभागाने तयार केला होता.
संगमनेरमधील धांदरफळ, निमज, डेरेवाडी, गोडसेवाडी, राजापूर या गावांना गारपीटीचा फटका बसला. गहू, कांदा, टोमॅटो, मका, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले. डेरेवाडी येथे संजय साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळाने उडाली. या घटनेत आदिती संजय साबळे जखमी झाल्या, त्यांच्यावर लोणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साठेनगर येथील भास्कर आल्हाट यांच्याही घरावरील पत्रे उडाली. वर्षा भीमराव गोर्डे यांचे घर कोसळून नुकसान झाले.
निमज येथील महानुभव पंथाच्या आश्रमावरील पत्रेही उडाली. आज सकाळी आमदार अमोल खताळ तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी, अशी मागणी थोरात यांनी केली.
अकोल्याच्या पूर्व भागातही गारांचा पाऊस पडला. अकोले शहरात दुपारपासूनच विजेचा लपंडाव सुरू होता, त्याचाही फटका व्यापाऱ्यांना बसला. दुपारनंतर वातावरण बदलले व पावसास सुरुवात झाली. सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. कोतूळ, ब्राह्मणवाडा परिसरात गारपीट झाली. धामणगाव पाट, अकोले शहर, सुगाव, वीरगाव, देवठाण, उंचखडक येथेही गारा पडल्या. मुळा, प्रवरा, आढळा नदीच्या खोऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. गहू, उन्हाळी कांदा पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असतानाच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली.
श्रीरामपूर मध्ये झालेल्या वादळी पावसाने रामनवमी उत्सवातील भाविक व व्यापाऱ्यांची धावपळ उडवली.
