राहाता: आश्वी परिसरात झालेल्या वळवाच्या वादळी पावसाने दोघांचा बळी घेतला. निसर्ग प्रकोपाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका ४२ वर्षीय महिलेचा वीज पडून व एका ७० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला तर रणखांब परिसरात पाच शेळ्यांचा मृत्यु झाला. वादळामुळे ३० ते ४० विद्युत खांब व काही ठिकाणी रोहित्र पडल्याने २४ तासांहून अधिक काळ आश्वी परिसराचा वीजपुरवठा खंडित होता. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
काल, बुधवारी सायंकाळी खंडित झालेला वीजपुरवठा आज, गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरळीत करण्यासाठी वीजवितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत होते. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळाने आश्वी परिसराला झोडपून काढले. शेतात काम करताना लोहारे येथील ज्ञानेश्वर रनमाळे यांच्या शेतात कामासाठी वास्तव्यास असलेल्या लताबाई कैलास सोनवणे (वय ४२) यांचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. तर दुसरी घटना डिग्रस येथे घडली.
महादू दगडू माळी (वय ७०) हे वादळी पाऊस सुरू झाल्याने सुरक्षिततेसाठी घरात थांबले होते. कुटुंबातील इतर सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेल्याने ते घरी एकटेच होते. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, घराची भिंत कोसळून महादू माळी त्याखाली गाडले गेले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत घुलेवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रणखांब परिसरातील सुधाकर पांडुरंग मनसुख व सुभाष लहानु गुळवे यांच्या शेळ्या एकत्र चरण्यासाठी गेल्या असताना ६ च्या सुमारास वीज पडुन ५ शेळ्यांचा मृत्यु झाला. दरम्यान, वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे हजारवाडी, प्रतापपूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, शेडगाव, पिप्री-लौकी अजमपूर यासह अनेक गावात देखील घरांची पडछड झाल्यामुळे नुकसान झाले आहे तर, काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी जुने मोठे वृक्ष उन्मळून पडले.
वादळी पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे. शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पीडित कुटुंबांना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी आणि नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
