अहिल्यानगर: विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत आज, सोमवारी अखेरच्या दिवशी भाजप तथा महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेस किंवा महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात अपयशी ठरली. काँग्रेसचे करण ससाने यांनी अर्ज दाखल केला असला तरी तो अपक्ष म्हणून. याशिवाय काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालेले शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आणि शरद पवार गटाने जाहीर करूनही खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या दोघांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केलेच नाहीत.
महाविकास आघाडीतील या गोंधळाच्या परिस्थितीमुळे निवडणूक बिनविरोध होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज, भाजपचे प्राजक्त तनपुरे यांनी चार अर्ज दाखल केले. याशिवाय करण ससाने, कमलेश गांधी, मच्छिंद्र धुमाळ व दत्तात्रय पानसरे या चौघांनी अपक्ष अशा एकूण ५ उमेदवारांनी ८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील दत्तात्रय पानसरे हे अजित पवार गटाचे पदाधिकारी व राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष आहेत तर मच्छिंद्र धुमाळ हे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आहेत. पानसरे हे राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांची उमेदवारी बंडखोरी की दबावतंत्राचा भाग, यांची चर्चा होत आहे.
काँग्रेस आणि शरद पवार गटाने आपल्या तलवारी अचानकपणे म्यान केल्याने चर्चा होते आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जूनपर्यंत आहे. तोपर्यंत कोणकोण उमेदवारी अर्ज मागे घेणार, याकडे लक्ष राहणार आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती, मात्र माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आपण उमेदवारी दाखल केली.
मात्र दोन दिवसांपूर्वी थोरात यांच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची संगमनेरमध्ये बैठक झाली. त्यावेळी दीप चव्हाण व करण ससाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवावेत उमेदवारीचा निर्णय थोरात घेतील असे ठरले होते. पक्षाने दीप चव्हाण यांच्या नावाने एबी फॉर्म पाठवला होता. चव्हाण यांनी निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज आलेला नेला, मात्र तो प्रत्यक्षात दाखल केलाच नाही. दुसरीकडे पक्षाने ससाने यांनाही उमेदवार दिली नाही, त्यामुळे त्यांचा अर्जही अपक्षच ठरला.
दरम्यान काँग्रेसमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी काल, रविवारी पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. राणी लंके यांनीही निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेला होता. मात्र तो प्रत्यक्षात दाखल केलाच नाही. तत्पूर्वी आमदार रोहित पवार व खासदार लंके यांच्या उपस्थितीत पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
त्यामध्ये महाविकास आघाडीमधील वाटपात अहिल्यानगरची जागा काँग्रेसला गेल्यामुळे उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय झाल्याचा तसेच पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय झाल्याची माहिती पक्षाची जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली. महाविकास आघाडीमधील काँग्रेस व शरद पवार गट या दोन्ही पक्षांनी जाहीर करूनही अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाच नाही.
पुरस्कृतसाठीही ‘मविआ’मध्ये गोंधळच
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्यामुळे आपल्याला पुरस्कृत करावी अशी मागणी आपण पक्षाकडे करणार असल्याचे उमेदवार करण ससाने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले तर दुसरीकडे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी करण ससाने, दत्तात्रय पानसरे किंवा मच्छिंद्र धुमाळ यापैकी एकाला पुरस्कृत करण्याची मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार असल्याचे सांगितले.
