अहिल्यानगर: विधान परिषदेच्या अहिल्यानगर जागेवर दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी निवडणुकीत वेगळा विचार करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात आमदार जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने भाजपने सुटकेचा विश्वास सोडला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कोणताही वेगळा विचार करणार नाही, ते आमच्याबरोबरच आहेत, असे स्पष्ट केले.

विधान परिषदेच्या अहिल्यानगर जागेवर यापूर्वी राष्ट्रवादीचे अरुण जगताप दोनवेळा विजयी झाले होते. मात्र यंदा महायुतीच्या जागा वाटपात अहिल्यानगरची जागा भाजपकडे गेली आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी व पक्षाचे स्व. अरूण जगताप यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांच्या उमेदवारीबाबत निर्णय व्हावा अशी मागणी करत जगताप समर्थक माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक गणेश भोसले यांनी निवडणुकीत वेगळा विचार करण्याचा इशारा दिला होता.

उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आयुर्वेद शास्त्रसेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्यासाठी समर्थक नगरसेवकांनी निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेलाही होता. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, आजपर्यंत त्यांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. जगताप यांच्याकडे मते मिळवण्याचे कौशल्य असल्यामुळे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार का, याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांनी महापालिकेत एकत्रित सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप समर्थक नगरसेवकांनी दिलेल्या इशाऱ्याची भाजपमध्ये चर्चा होत होती.

जगताप समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांच्याही उमेदवारीला आक्षेप होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तनपुरे यांना मंत्रिपद मिळाले. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता होती, मात्र तनपुरे यांचे मामा, शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यामुळे जगताप यांची ही संधी हुकली असाही जगताप समर्थक नगरसेवकांचा अक्षेप होता. या पार्श्वभूमीवर सचिन जगताप उमेदवारी अर्ज दाखल करतात का याकडे लक्ष लागलेले होते.

राष्ट्रवादी आमच्या सोबतच, याची खात्री- विखे

आमदार जगताप समर्थक नगरसेवकांनी दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, असा कोणताही वेगळा विचार राष्ट्रवादी करणार नाही, याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी निश्चित करताना आमदार संग्राम जगतापही सहभागी होते. ते आमच्याबरोबरच आहेत.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली.

राष्ट्रवादीने दिलेल्या इशाऱ्याकडे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट माझ्या कानावर आली नाही. चौंडी येथे काल, रविवारी मी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एकत्रच होतो. तेथे आमची चर्चाही झाली. राष्ट्रवादीची काही भूमिका वेगळी भूमिका असती तर त्या माझ्याशी बोलल्या असत्या. परंतु त्यांनी काही सांगितले नाही.

आमदार संग्राम जगताप यांची अनुपस्थिती

भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अनुपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप यांच्या अनुपस्थितीकडे लक्ष वेधले जात आहे. तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री विखे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते आदी उपस्थित होते.