अहिल्यानगर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची अहिल्यानगरची जागा महाविकास आघाडीतील वाटपात काँग्रेसकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज आज, शुक्रवारी दाखल केला. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आपण अर्ज दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २७ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज नेले आहेत. करण ससाणे हे शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे दिवंगत माजी अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांचे चिरंजीव आहेत. करण यांची आई राजश्री ससाने श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष होत्या. श्रीरामपूर नगरपालिका सध्या करण ससाने यांच्या ताब्यात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार (दि. १) आहे.

आत्तापर्यंत ससाने यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे. महायुतीमध्ये अहिल्यानगरची जागा अधिक संख्याबळाच्या आधारावर भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे तसेच शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचा उद्या, शनिवारी मुंबईत भाजप प्रवेश होत असून त्यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने तसेच महायुतीकडून भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही.

उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांमध्ये अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू तथा जिल्हा परिषद माजी सदस्य सचिन जगताप, भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचाही समावेश आहे. सचिन जगताप हे याच जागेवर निवडून गेलेले दिवंगत माजी आमदार अरुण जगताप यांचे चिरंजीव आहेत. विधान परिषदेची जागा यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादीने जिंकली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडूनही जागेची मागणी होत आहे. मात्र पक्षाकडे मतदार संख्या अधिक असल्याचा दावा करत अहिल्यानगरची जागा भाजपकडे गेली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे सचिन जगताप अर्ज दाखल करणार का, याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

याच मतदारसंघात पूर्वी स्व. जयंत ससाने (कॉंग्रेस) व स्व. अरुण जगताप (राष्ट्रवादी) यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यावेळी अरुण जगताप यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. दरम्यान भाजपकडून देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम हेही इच्छुक आहेत. त्यांनीही निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेला असला तरी प्रत्यक्षात ते उमेदवारी अर्ज दाखल करणार का, याबद्दलही चर्चा होत आहे. सत्यजित हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नगरच्या (चौंडी) दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी सत्यजित कदम हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.