अहिल्यानगर: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम अंतर्गत (एसआयआर) पडताळणीत जिल्ह्यात ३८ लाख १० हजार मतदारांपैकी ४ लाख २६ हजार ९३० (११.२२ टक्के) मतदार मयत, दुबार किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित (असंकलित मतदार) आढळले होते, ही नावे वगळून आज, सोमवारी जिल्ह्यातील ३३ लाख ३८ हजार १८७ मतदारांची प्रारूप यादी प्रसिध्द करण्यात आली.

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यांचे निराकरण २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येईल. अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदार यादी बघता येणार आहे. तसेच ‘बीएलओ’कडूनही त्याची माहिती घेता येईल. सुनावणी दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर कक्ष तयार करण्यात आला आहे. तालुकास्तरावर समन्वयासाठी तालुकास्तरीय अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचा मिळून एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

असंकलित मतदारांचे (मयत, दुबार, कायमस्वरूपी स्थलांतरित) आवश्यक ते माहिती ‘बीएलओं’नी जतन करून ठेवावी, तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर नमुना ६, ७ व ८ पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मतदार यादीत नाव, स्पेलिंग, वय-जन्मतारीख, छायाचित्र, पत्ता, मतदार क्रमांक आणि मतदान केंद्र योग्य आहे का, हेही तपासून घ्यावे. मतदार यादीत नाव नसल्यास ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येतील. त्यावर सुनावणी होईल. नवीन नाव नोंदणीसाठी, वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मतदार संख्या

प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण मतदारांची संख्या ३३ लाख ८३ हजार १८७ आहे. यात अकोले २ लाख ५२ हजार २५१, संगमनेर २ लाख ६३ हजार ११४, शिर्डी २ लाख ५३ हजार ५४४, कोपरगाव २ लाख ५० हजार ७६, श्रीरामपूर २ लाख ७४ हजार ७२६, नेवासा २ लाख ६५ हजार ३८९, शेवगाव ३ लाख ३५ हजार ५५७, राहुरी २ लाख ९५ हजार ६७२, पारनेर ३ लाख १९ हजार ६०९, नगर शहर २ लाख ४६ हजार ४२४, श्रीगोंदा ३ लाख ८ हजार ११६, कर्जत- जामखेड ३ लाख १८ हजार ७०९ आणि एकूण मतदार ३३ लाख ८३ हजार १८७.

वगळलेले मतदार

-मयत मतदार १ लाख ४१ हजार २१२
-गैरहजर ५० हजार १६७
-कायमस्वरूपी स्थलांतरित १ लाख ७१ हजार ७१९
-इतर मतदार १ हजार १२५
-यापूर्वी नोंदणी झालेले ६२ हजार ७०७