अहिल्यानगर: जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट अधिकच वाढू लागले आहे. गेल्या आठवडाभरात ३२ टँकरची वाढ झाली. सध्या जिल्ह्यात १२५ टँकरमार्फत १३९ गावे, ७३८ वाड्यावस्त्यांवरील २ लाख ३५ हजार ७२८ लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिण भागात टँकरची मागणी वाढलेली आहे. टँकर मंजूर झाले तरी त्याच्या प्रत्यक्षात खेपा कमी होत असल्यामुळे नागरिकांना आवश्यकतेपेक्षा कमी पाणी उपलब्ध होत आहे.
पाणीपुरवठ्यासाठी दिवसभरात १२५ टॅंकरच्या एकूण २९४ खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात २६१ खेपा होत आहेत. ज्या तालुक्यात टंचाईची तीव्रता अधिक आहे तेथेच म्हणजे कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुक्यात टँकरच्या खेपा निम्म्याने कमी होत आहेत. उद्भावाचे पाणी कमी होणे, वीजपुरवठा खंडित होणे, टँकर नादुरुस्त होणे अशा विविध कारणांनी टँकर गावांपर्यंत पोहोचत नाहीत.
दक्षिण भागात टँकरची संख्या वाढलेली असली तरी जिल्ह्यात अद्याप कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर, राहता व श्रीगोंदा या पाच तालुक्यातून अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. उत्तरेतील अकोला व दक्षिणेतील राहुरी वगळता इतर सर्व तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत.वाढत्या उन्हामुळे भूजल पातळी विलक्षण खालावू लागली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही आटू लागले आहेत. धरणातील पाण्याची वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पाण्याचे उद्भव असलेल्या विहिरीही कोरड्या पडू लागले आहेत.
तालुकानिहाय गाव, वाड्यावस्त्या व टँकरची संख्या पुढीलप्रमाणे- संगमनेर २८ गावे ७१ वाड्यावस्त्यामधील ३९ हजार २२६ लोकसंख्येला २१ टँकर, अकोल्यातील पाच गावे २१ वाड्यावस्त्यांच्या ७ हजार १०७ लोकसंख्येला ४ टँकर, नेवासातील १ गाव, १७ वाड्यावस्त्यावरील २ हजार ३७६ लोकसंख्येला १ टँकर, अहिल्यानगर १५ गावे ६३ वाड्यामधील २ हजार ३५३ लोकसंख्येसाठी १५ टँकर, पारनेर ३८ गावे, ३०३ वाड्यातील ७१ हजार ६५५ लोकसंख्येसाठी ३५ टँकर, पाथर्डीतील १६ गावे, ७६ वाड्यांमधील ४० हजार ९५१ लोकसंख्येला २३ टँकर, शेवगावमधील १० गावे ५२ वाड्यातील १४ हजार ९७ लोकसंख्येला ७ टँकर, कर्जतमधील १३ गावे, १०१ वाड्यांना १२ टँकरमार्फत २४ हजार २०३ लोकसंख्येला, जामखेडमधील ३ गावे, ३ वाड्यामधील ७ हजार ५६० लोकसंख्येला ३ टँकरमार्फत, पारनेर नगरपंचायत हद्दीतील ३१ वाड्यातील ५ हजार लोकसंख्येसाठी ४ टँकर सुरू करण्यात आले आहेत.
