अहिल्यानगर : वाढत्या उन्हाळ्यामुळे भूजल पातळी खालावू लागल्याने तसेच गावोगावचे तलाव, बंधारे कोरडे पडू लागल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील १६७ गावांच्या पाणीयोजना उद्भव कोरडे पडल्याने बंद पडल्या आहेत. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी यंदा टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. दरम्यान जिल्ह्यात ७४ टँकरमार्फत १ लाख १३ हजार २२५ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ही माहिती उपलब्ध झाली. गेल्या वर्षी पाऊस वेळेवर सुरू झाल्याने व त्यापूर्वी समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीयोजना बंद पडण्याचे तसेच टँकर सुरू करावे लागल्याचे प्रमाण कमी होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत ‘जलजीवन मिशन’ हा महत्वकांक्षी कार्यक्रम राबवला जात आहे. मात्र सध्या या कार्यक्रमाची गती निधी अभावी विलक्षण मंदावलेली आहे. परिणामी ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक बिकट होण्याच्या मार्गावर आहे.
पाण्याचे स्रोत आटू लागल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या पाणीयोजना बंद पडू लागल्या आहेत. जिल्ह्यात गावांच्या वैयक्तिक १३८९ स्वतंत्र पाणीयोजना आहेत. त्यातील १६७ पाणीयोजना आतापर्यंत बंद पडल्या आहेत. ही संख्या पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरवरील पाणीपुरवठ्याचा भारही वाढणार आहे.
जलजीवन मिशन सन २०२० पासून सुरू करण्यात आली. जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अशा दोन यंत्रणांकडून हा कार्यक्रम राबवला जात आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ८३० पाणी योजनांची कामे सुरू करण्यात आली. त्यातून ९२७ गावांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची उद्दिष्ट होते. मात्र यातील केवळ २७४ पाणीयोजना पूर्ण झाल्या आहेत. ४३० पाणी योजनांची कामे निधी अभावी अपूर्ण आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत ११२ प्रादेशिक पाणीयोजनांची कामे सुरू करण्यात आली. मात्र पाच वर्षात केवळ ३ योजना पूर्ण झाल्या आहेत. मोठा निधी खर्च होऊनही पुन्हा टँकरवर खर्च करावा लागत आहे.
पाणी योजना बंद पडण्याचे सर्वाधिक प्रमाण पाथर्डी तालुक्यात आहे. तेथे १०७ पैकी ३६ पाणीयोजना बंद पडल्या आहेत. अकोल्यामध्ये ५, जामखेडमध्ये २३, कर्जत १४, अहिल्यानगर १२, पारनेर ३१, पाथर्डी ३६, राहुरी ९, संगमनेर ८ व शेवगाव ११ अशा बंद पडलेल्या पाणी योजनांची संख्या आहे. कोपरगाव, राहाता, श्रीगोंदे व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये मात्र एकही पाणीयोजना बंद पडलेली नाही.
७४ टँकरमार्फत पाणीपुरवठा
जिल्ह्यामध्ये ७४ गावे ३५८ वाड्यावस्त्यावरील १ लाख १३ हजार २२५ लोकसंख्येला ७४ टँकरमार्फत पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १६७ गावांच्या पाणीयोजना बंद पडल्याने आता टँकरची संख्याही वाढणार आहे.
