अहिल्यानगर: उन्हाच्या व दुष्काळाच्या झळया वाढू लागल्या असतानाच भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावू लागली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विंधनविहिरी (हातपंप) घेण्यावर निर्बंध आणले गेले आहेत. मात्र पूर्वी घेतलेल्या विंधनविहिरींचा आधार सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत मिळतो आहे. जिल्ह्यातील ११ हजार ७१९ हातपंपापैकी ६ हजार ५८५ हातपंपांच्या माध्यमातून सुमारे ६ लाखांवर लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा आधार मिळतो आहे. जिल्ह्यात सध्या १२९५ हातपंप कायमस्वरूपी नादुरुस्त आहेत तर ६०४२ हातपंप आठमाही स्वरूपाचे आहेत. १०५६ हातपंपांचे पाणी पिण्यास अयोग्य आहे.
दुष्काळाची तीव्रता वाढत असताना भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाच्या यांत्रिकी विभागाच्या माहितीनुसार, अद्याप पाण्याची पातळी खालावली म्हणून हातपंप बंद पडण्याचे प्रमाण वाढलेले नाही. पुढील महिन्यापासून हातपंप बंद पडण्यास सुरुवात झाल्यास. सध्या हातपंप सुरू असल्यामुळे टँकर सुरू करण्यात अटकाव बसलेला आहे. टँकरच्या पुरेशाखेपणा होणे वेळेवर टँकर न पोहोचणे गळकट टँकर मधून पुरेसा पुरवठा न होणे अशा अनेक अडथळ्यांवर हातपंपांमुळे नागरिकांना मदत होत आहे.
सध्या जिल्ह्यात १६१ गावे व ९६१ वाड्यावस्त्यांवरील ३ लाख ३१ हजार लोकसंख्येला १६९ टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. म्हणजे टॅंकरपेक्षा हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या जवळपास दुप्पट आहे. पिण्याच्या पाणी योजना नाही किंवा उद्भव कोरडा पडल्यामुळे पाणीयोजना बंद झाली अशा परिस्थितीत टँकर व हातपंपावर १० लाख लोकसंख्या सध्या अवलंबून आहे.
जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ११७१९ हातपंप आहेत. त्यातील ७६४१ जिल्हा परिषदेचे तर २७१४ ग्रामपंचायतींचे आहेत. १२९५ हातपंप कायमस्वरूपी बंद आहेत. ६०४२ हातपंप आठमाही स्वरूपाचे आहेत तर वर्षभर चालणाऱ्या हातपंपांची संख्या केवळ ४२ आहे. १०५६ हातपंपांचे पाणी पिण्यास अयोग्य आहे.
दुरुस्तीसाठी १४ फिरती पथके
विंधनविहिरींच्या (हातपंप) दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने तालुकानिहाय १४ फिरती पथके नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये एकूण ३६ कर्मचारी आहेत. हातपंप नादुरुस्त झाल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे नोंदवल्यानंतर पथक तेथे जाऊन दुरुस्ती करते. एका पथकामार्फत रोज दोन किंवा तीन हातपंपांची दुरुस्ती केली जाते. यासाठी जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १.१० कोटींची, सुट्ट्या भागांसाठी २० लाखांची व वाहनाच्या इंधन वंगणासाठी १५ लाख रुपयांची तरतूद स्वनिधीतून (सेस) केली आहे. सर्वाधिक हातपंप श्रीगोंदा तालुक्यात १६८६, त्याखालोखाल कर्जतमध्ये १२५५ तर सर्वात कमी अकोल्यात ४२३ व राहुरीत ५६२ संख्या आहे.
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विंधनविहिरी
जिल्ह्यातील आमदारांनी सन २०१७-१८ नंतर हातपंपांसाठी निधी उपलब्ध केलेला नाही. ग्रामपंचायतीला मात्र हातपंपांसाठी १५ व्या वित्त आयोगाचा हातभार मिळत आहे. टंचाई कार्यक्रमातही सन २०१९ नंतर हातपंप प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. शासकीय निधीतून ७० ते ८० फूट विंधनविहिरी खोदल्या जातात. मात्र खाजगी विंधनविहिरी बेसुमार खोलीवर जात असल्यामुळे शासकीय हातपंपांचे पाणी लगेच कमी होते.
आराखडा तयार करण्याचे काम सुरूग्रामीण पाणीपुरवठ्याच्या यांत्रिकी विभागामार्फत हातपंप दुरुस्तीचे काम दैनंदिन सुरू आहे. त्यासाठी तालुकानिहाय एकूण १४ फिरती पथके नियुक्त आहेत. सद्यस्थितीत भूजल पातळी वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. नवीन विंधनविहिरी घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवरून मागणी आल्यास कार्यक्रम राबवण्यात येईल, त्यासाठी टंचाई आराखड्यात विंधनविहिरीची उपायोजना सुचवून आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. – निखिल पटारे, उपअभियंता, यांत्रिकी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद.
