अहिल्यानगर : गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झालेला असला तरी, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने जिल्ह्यात टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. पहिला टँकर धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यात सुरू करण्यात आला आहे. तेथे लाडगाव व परिसरातील सहा वाड्यावस्त्यांवरील १ हजार १७६ लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यानुसार जूनअखेर ३७३ गावे व १७३२ वाड्यावस्त्यांना टंचाई भासू शकते.
जिल्हाधिकारी कार्यालयाने टंचाई निवारणार्थ ग्रामीण भागासाठी २० कोटी ६१ लाख रुपये खर्चाचा तर शहरी भागासाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. शहरी भागामध्ये केवळ शेवगाव पालिका व लगतच्या १५ वाड्यावस्त्यांना टंचाई भासू शकते. तर ग्रामीण भागात ३७३ गावे व १७३२ वाड्यावस्त्यांना टंचाई भासू शकते.
टंचाई आराखड्यानुसार बुडक्या खोदाई, विहीर खोलीकरण, खाजगी विहिरी अधिग्रहित करणे, टॅंकर भरण्यासाठी जागा निश्चित करणे, टँकरने किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, नळपाणी योजना पूर्ण करणे, नळपाणी योजनांची दुरुस्ती, विंधन विहिरींची दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे अशा योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाने ३४ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावेळी जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण १८१ टँकरने एकूण १६२ गावे व ९१९ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे धरणे, पाझर तलाव, गाव तलाव, तुडुंब भरले होते. त्यामुळे यंदा टंचाई कमी प्रमाणात भासण्याची शक्यता आहे तसेच टँकरची संख्याही कमी लागणार आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्याला गारपीट व पावसाने झोडपले. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. असे असले तरी जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे.
अपूर्ण पाणीयोजनांची संख्या मोठी
जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार जलजीवन मिशनमार्फत जिल्ह्यात एकूण ८३० पाणीयोजना राबवल्या जात आहेत. मात्र गेल्या चार वर्षात केवळ ६७ पाणीयोजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाल्या आहेत. १५४ योजना पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप त्या ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. या योजनांना आणखी काही वाड्यावस्त्या जोडाव्यात अशी ग्रामपंचायतींची मागणी आहे. याशिवाय एकूण २७४ योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
तसेच ४१३ योजनांची कामे कामे ७६ ते ९९ टक्क्यांपर्यंत झालेली आहेत. जलजीवन मिशनमधील पाणी योजना पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरी निधीची चणचण भासत आहे. ठेकेदारांची सुमारे ९५ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम टँकर सुरू होण्यावर होऊ शकतो.
धरणातून पाणीसाठा समाधानकारक
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. (आकडेवारी ‘दलघफु’मध्ये) भंडारदरा ७८५८ (७१.१८ टक्के ), मुळा १८०२५ (६९.३३ टक्के ), निळवंडे ४१५७ (४९.९६ टक्के), आढळा ७४१ (६९.९१ टक्के ),मांडओहळ ११८ (२९.५० टक्के ), पारगाव घाटशिळ २४२ (५५.५८ टक्के ), सीना १९५० (८१.२५ टक्के ), खैरी ३२५ (६१ टक्के ) व विसापूर ५०६ दलघफू. (५६.१२ टक्के).
