अहिल्यानगर: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगर शहराचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत. दिवाळीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याशिवाय प्रेशर पंप चालक वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करत असतील तर त्याची तपासणी करून नळजोड बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पिण्याच्या पाणी वापरामध्ये किमान १० टक्के कपात करण्याची सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचेही आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मुळा धरणातील जलसाठ्याचे नियोजन करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा किंवा पाणीपुरवठ्याच्या वेळेत पंधरा मिनिटे कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र वेळेच्या कपातीची अंमलबजावणी होणे अवघड असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

याशिवाय पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीही मनपाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. प्रेशर पंप चालक वाहने धुण्यासाठी जर पिण्याच्या पाण्याचा वापर करत असतील तर त्याची तपासणी करून त्यांचे नळजोड बंद केले जाणार आहेत. बांधकामासाठी पिण्याच्या पाणी वापरणाऱ्यांचे नळजोड प्रभाग पथकांमार्फत तोडले जाणार आहेत.

शहरातील नळजोडांची तपासणी करून अनधिकृत नळजोड तोडणे व अनाधिकृत जलवाहिन्या बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तोट्या नसलेल्या नळजोड धारकांना स्वखर्चाने तातडीने तोट्या बसवण्याची सक्त लेखी ताकीद मनपाकडून दिली जाणार आहे. मालमत्ताधारकांनी त्याची अंमलबजावणी न केल्यास कारवाई केली जाणार आहे. शहरातील ‘स्टॅन्डपोस्ट’ही पूर्णपणे बंद केले जाणार आहेत.

पाणी बचतीसाठी जनजागृती

शहरात पाणी बचतीच्या जनजागृतीसाठी महापालिका मोहीम सुरू करणार आहे. त्यासाठी घंटागाडीच्या ध्वनीक्षेपकावरून नियमितपणे पाणी बचतीचे आवाहन केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करू नये, रस्त्यावर पाणी मारण्यासाठी करू नये असे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसेच नळाला थेट मोटर जोडल्यास नळजोड कायमचे बंद केले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर आवश्यक कामांसाठी नागरिकांनी कुपनलिका, विहिरींचे पाणी वापरावे, असेही आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.

जलतरण तलावाला पाणीकपात

शहर पाणी योजनेच्या मुळा धरणावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून देहरे, शिंगवे नाईक, विळद गवळीवाडा या ग्रामपंचायतींनाही पाणीपुरवठा केला जातो. या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यामध्ये ५० टक्के कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय महापालिका मालकीच्या जलतरण तलावाचा पाणीपुरवठाही ५० टक्के कमी करण्याचे अथवा तो बंद ठेवण्याचे आदेशही पाणीपुरवठा विभागाला आयुक्तांनी दिले आहेत.