अहिल्यानगर : गेल्या महिनाभरापासून झालेल्या शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याला महावितरण जबाबदार असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. गेल्या १ एप्रिलपासून आत्तापर्यंत शहर पाणीपुरवठा योजनेतील मुळानगर, विळद, नागापूर, वसंतटेकडी येथील उपसा केंद्रावर तब्बल ३१ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरातील पाणी वितरण टाक्या वेळेत भरता येत नाहीत. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत असल्याचे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
गेल्या एक एप्रिल पासून शहर पाणी योजनेचा वीजपुरवठा कितीवेळा खंडित झाला, याची नोंद महापालिकेने ठेवली असून त्याची माहिती महावितरणला कळवली आहे. दरम्यान शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर ज्योती गाडे यांनी वसंतटेकडी येथील उपसा केंद्राला भेट देत पाहणी केली. यावेळी जलअभियंता गणेश गाडळकर यांनी यासंदर्भात महावितरणला पत्रही देण्यात आल्याचे महापौरांना सांगितले.
नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करून आयुक्त डांगे यांनी सांगितले की पाणीपुरवठा योजनेवरील उपसा केंद्रांचा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी जरी खंडित झाला तरी यंत्रणा पुन्हा सुरळीत होऊन पाणी उपसा पुर्ववत होण्यासाठी काही तासांचा अवधी लागतो.
सध्याच्या नोंदीनुसार १ एप्रिलपासून आतापर्यंत मुळानगर, विळद, नागपूर व वसंत टेकडी या मुख्य केंद्रांवर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. सकाळ, दुपार व काही वेळेस मध्यरात्री ही वीज जात असल्याने पाणी उपसा बंद होतो. परिणामी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभामध्ये आवश्यक पाणीसाठा निर्धारित वेळेत जमा होऊ शकत नाही. कारण वेळेत पाणी टाकीत जमा न झाल्यास शहराच्या विविध भागात पाणी वितरणाचे नियोजन विस्कळीत होऊन नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाले आहेत.
वीसपुरवठ्यात निर्माण झालेली अडचण ही महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्भवली आहे. या संदर्भात महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे, असे महापौर गाडे यांनी सांगितले. सध्याच्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, त्यासाठी तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. पाण्याचे योग्य नियोजन करावे व पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशाही सूचना महापौर गाडे यांनी दिल्या आहेत. या परिस्थितीतून तोडगा काढण्यासाठी महावितरणला पत्र देण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध पर्याय उपाययोजना करण्यात येत असल्याचे गाडळकर यांनी सांगितले.
