अहिल्यानगर: राज्य सरकारच्या ‘उमेद’- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना संघटित करून शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ मूल्यसाखळी विकास करण्यासाठी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५ महिला उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असून सुमारे ३ हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) हा जागतिक बँक अर्थसहाय्यित प्रकल्प आहे. छोट्या शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे, कृषी मूल्यसाखळी विकसित करणे आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना सक्षम करून त्यांना बाजाराशी जोडणे असा उद्देश आहे. या प्रकल्पात जिल्ह्यात ५ महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली. पाथर्डी-शेवगावमध्ये सुधामूर्ती व कान्होपात्रा महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून धान्य संकलन प्रतवारी व स्वच्छता केंद्र तसेच आटा करण्यात येणार आहे. नगर तालुक्यात वत्सुरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीत कांदा साठवणूक गोदामांची उभारणी होत आहे. राहुरीत आयरा गोल्ड व कोपरगावमध्ये सरोवर महिला शेतकरी उत्पादक कंपनीतून धान्य संकलन प्रतवारी व स्वच्छता केंद्र व डाळ मिल उपक्रम उभारण्याची सुरुवात झाली आहे.
पीएम प्रकल्पात चार कंपन्यांचा समावेश
पंतप्रधानांच्या महत्त्वकांक्षी १० हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जिल्ह्यात ‘उमेद’च्या माध्यमातून ४ शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतंत्रपणे स्थापण्यात आल्या असून कोपरगावच्या कौशल्या ग्रो महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनी, शेवगावच्या स्मृतिमंथन महिला शेतकरी उत्पादक कंपनी, कर्जतची शेतीसंजोग महिला शेतकरी उत्पादक उत्पादक कंपनी व नेवासातील मातीस्पर्श महिला शेतकरी कंपनीच्या स्थापण्यात आल्या आहेत. या कंपन्यांनी शेतकरी कृषी सेवा केंद्रांची सुरुवात केली आहे. या केंद्रातून सवलतीत कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
२ कोटीचे अनुदान
महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपप्रकल्प उभारण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत ६० टक्के अनुदान प्राप्त झाले असून सर्व प्रकल्पांना २ कोटीपेक्षा अधिक अनुदान टप्प्या टप्प्याने प्राप्त होणार आहे. ४० टक्के निधी हा महिला शेतकर्यांनी उभारला आहे. या कंपनीच्या माध्यमातून ३ हजारांवर महिला शेतकरी संघटित झाल्या आहेत. यामधून ग्रामीण भागातील शेतकर्यांना संघटित शेती करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यातून शेतकर्यांची क्रयशक्ती वाढवण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांना मोठी संधी
‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली असून जिल्ह्यातील महिला शेतकर्यांना यामुळे फायदा होणार आहे. कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. मूल्यसाखळीचे निर्माण करणे आदी उपक्रमातून ग्रामीण शेतकर्यांना कंपनीच्या माध्यमातून संधी निर्माण होत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्ताने ‘उमेद’ने सुरू केलेल्या या शेतकरी उत्पादक कंपन्या महत्त्वाची भूमिका निभावतील. -आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

