अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इयत्ता ५ वी ते ८ वीतील निवडक ४२ विद्यार्थी आज, सोमवारी विमानाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी बेंगलोरला रवाना झाले. हे विद्यार्थी थुंबा (केरळ) येथील डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटरलाही भेट देणार आहेत. या शैक्षणिक सहलीचा सर्व खर्च जिल्हा परिषद करणार आहे.
विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेऊन त्याद्वारे ४२ विद्यार्थ्यांची इस्रोच्या सहलीसाठी निवड करण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी प्रथमच विमान प्रवास करत आहेत. प्रथमच विमान प्रवास घडत असल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. त्यांच्या समवेत अधिकारी, शिक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आहे.
जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण व्हावी, कुतूहल व संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, वैज्ञानिक क्षेत्रात असलेल्या विविध संधींची ओळख व्हावी, यासाठी ही सहल दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले. त्यांनी निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व पालकांचेही अभिनंदन केले.
सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भावी संशोधक होण्याच्या दृष्टीने ही संधी आहे. यातून प्रेरणा घेऊन भावी संशोधक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी ही सहल विद्यार्थ्यांच्या जीवनात चिरकाल स्मरणात राहील, असे सांगत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
दि. २३ जानेवारीला हे विद्यार्थी परत येतील. सर्व १४ तालुक्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गटशिक्षणाधिकारी आज सकाळी ७.३० वा. जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित राहिले. काही पालकही त्यांच्यासमवेत होते. जिल्हा परिषद सभागृहातील छोटेखाणी सभेत विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन सकाळी १० वा. पुणे विमानतळाकडे रवाना करण्यात आले. त्यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, वैद्यकीय अधिकारी श्रुती मांगुळकर, विस्तार आधिकारी, विलास साठे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र नायर, कनिष्ठ सहाय्यक प्रशांत सदावर्ते, पदवीधर शिक्षक अंतोन पवार, उपाध्यपिका संगीता लोखंडे व प्रशांत दिघे असे आठ जणांचे पथक आहे. एकूण ५० व्यक्तींचा सहलित समावेश आहे.
सहलीमध्ये विद्यार्थी बेंगलोर येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, सर विश्वेश्वरय्या संग्रहालय येथे भेट देतील तसेच थुंबा येथील डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर व रॉकेट प्रक्षेपण केंद्र, संग्रहालय, त्रिवेंद्रम येथील प्राणी संग्रहालय, मत्स्यालय याला भेट देणार आहेत.
