अहिल्यानगर: जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा आज, रविवारी प्रचंड गोंधळात पार पडली. महिला शिक्षक सभासदही या गोंधळात मागे नव्हत्या. शिक्षिकांनीही एकमेकींच्या अंगावर धावून जात ध्वनीवर्धकाची ओढाताण केली. सभा-प्रतिसभा, आरडाओरडा, घोषणाबाजी, मागण्यांचे फलक फडकावणे, चुकीचे शब्दप्रयोग त्याबद्दल दिलगिरी, अभिनंदन आणि निषेधाचे चित्कार असे प्रकार सभेत घडले.
या गोंधळातच सत्ताधारी संचालक मंडळाचे नेते बापू तांबे यांनी विरोधामुळे शेड्युल्ड बँकेच्या दर्जाचा विषय स्थगित ठेवल्याचे, कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. विरोधकांचे आक्षेप, आरोप व मागण्यांना तांबे यांनीच संचालक मंडळाच्या परस्पर उत्तरे दिली. त्याला विरोधी गटाच्या प्रवीण ठुबे यांनी आक्षेप घेत बँक कोण चालवतोय, बँकेच्या अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे, निर्णय घेण्याचे अधिकार तांबे यांना कोणी दिला असे प्रश्न उपस्थित करत विरोधकांना बोलू दिले नाही, हुकूमशाही केली, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
बँकेची १०७ वी वार्षिक सभा अध्यक्ष सरस्वती घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच विरोधी गटाकडून सभागृहाबाहेर प्रतिसभा घेण्यात आली. शेड्युल बँकेचा दर्जा विशेष स्थगित ठेवावा, जिल्ह्याबाहेरील सभासद करू नयेत, मागील दाराने कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करू नये आदी विषयावरून विरोधकांचे नेते प्रवीण ठुबे यांनी सत्ताधारी मंडळावर आरोप केले. विरोधी गटाचे सभासद ‘आम्ही शिलेदार’ अशा टोप्या परिधान करून घोषणा देत सभागृहात आले. सभेच्या सुरुवातीपासूनच विरोधी गटाकडून मागण्यांचे फलक फडकवले जात होते.
सत्ताधाऱ्यांचे समर्थन करताना कांता बनकर यांनी ‘चिमूटभर महिला’ असा उल्लेख केल्याने विरोधक संतप्त झाले. विरोधी गटाच्या महिला सभासदही त्यांचा निषेध करत व्यासपीठाकडे धावल्या. मोठा गोंधळ उडाला होता. ध्वनिक्षेपकाची ओढाताण करत परस्परांवर आरोप केले जात होते. महिला एकमेकींच्या दिशेने धावल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. स्वाती गोरे, जयश्री झरेकर, अंजली महामेर, उषा बांडे, विद्या दिघे यांनी त्यांचा निषेध केला. अखेर सत्ताधार्यांनी दिलगिरी व्यक्त करत बनकर यांनी उल्लेखलेले शब्द कामकाजातून वगळण्याचे जाहीर केले.
विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देताच संचालक मंडळाचे नेते बापू तांबे यांनी जेवणाची सुट्टी जाहीर केली. त्यामुळे सत्ताधारी गटाचे सभासद जेवणाच्या पंक्तीकडे धावले. सत्ताधाऱ्यांनी बोलू दिले नाही, बँक अध्यक्षांच्या अधिकारावर तांबे यांनी गदा आणली असे सांगत प्रवीण ठुबे यांनी विरोधकांचा जेवणावर बहिष्कार जाहीर करत तेथेच पुन्हा प्रतिसभा घेतली व सत्ताधाऱ्यांचा कारभार कसा चुकीच्या पद्धतीने, कंत्राटी भरतीत कशा पद्धतीने सत्ताधारी स्वतःच्या जवळचे लोक घेत आहेत याची माहिती देण्यासाठी प्रत्येक शाखेसमोर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. एकनाथ व्यवहारे, सिताराम सावंत, विजय देठे, दिनेश खोसे यांनीही सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध केला. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच महिला सभासद मीनाक्षी अवचरे (नेवासा) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने चक्कर आली.
शेड्युल्ड बँक दर्जा विषय स्थगित
शेड्युल्ड बँकेचा दर्जाचा विषय सध्या स्थगित ठेवला तरी दिवाळीनंतर पुन्हा विशेष सभेची मंजुरी घेऊ. कर्ज व्याजदर ७ टक्के करण्याचा जाहीरनामा पाळला जाईल. डीसीपीएस शिक्षकांचा कुटुंब आधार निधी १५ लाखावरून २१ लाख, कर्ज मर्यादेत ५ लाखांनी वाढ करून ४० लाख, जामीन कर्जात ०.१० टक्के कपात, शैक्षणिक, गृह व वाहन तारण कर्ज ७ टक्के करू. पाल्यांच्या बक्षीस रकमेत दुप्पट वाढ होणार. मयत निधीची ७५० रुपये कपात बंद होणार. कंत्राटी कर्मचारी सन २०१६ पासून भरती होत आहेत. सन २००४-०५ मध्ये १५० कोटींच्या ठेवी असताना १७० कर्मचारी होते, आज १७०० कोटींच्या ठेवी असताना ८१ कर्मचारी आहेत. मी १५० कोटींच्या कोअर बँकिंगचा विषय काढला तर विरोधकांना पळून जावे लागेल. -बापू तांबे, सत्ताधारी मंडळाचे नेते
कंत्राटीच्या नावाखाली जवळच्या लोकांची भरती
कंत्राटी भरतीच्या नावाखाली संचालक मंडळाच्या नेत्यांच्या जवळचे लोक मागील दाराने भरती केले जात आहेत. चार वर्षानंतरही कर्ज व्याजदर सात टक्के करण्याचा शब्द पाळला नाही. व्यवस्थापन खर्चात मोठी वाढ कशामुळे झाली आहे? सभेत विरोधकांना बोलू न देता हुकुमशाही पद्धतीने सभा चालवली जात आहे. बँकेच्या अध्यक्षाऐवजी सभासदांच्या प्रश्नांना भलतेच कोणीतरी परस्पर उत्तर देत आहे. हा चुकीचा पायंडा पाडला गेला आहे. एक वर्षानंतर सत्ताधाऱ्यांचा टांगा पलटी होणार आहे. -प्रवीण ठुबे, विरोधकांचे नेते
