अहिल्यानगर:जिल्हा परिषदेचे आगामी सन २०२६-२७ या वर्षासाठी ५९ कोटी ५५ लाख रुपयांचे स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आले. या अंदाजपत्रकात प्राथमिक शाळातून एआय रोबोटिक लॅब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेद्वारे एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यास प्रोत्साहन अनुदान, ऊस, डाळिंब, केळी व इतर पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित योजना, साथीचे रोग किंवा विषबाधेमुळे जनावरे मृत झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई अशा नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांनी हे अंदाजपत्रक सीईओ भंडारी यांना सादर केले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. गेल्या वर्षीचे सन २०२५- २६ चे मूळ अंदाजपत्रक ५२ कोटी ५४ लाख रुपयांचे होते. मुद्रांक शुल्क मिळाल्यामुळे त्यामध्ये वाढवून ५७ कोटी रुपयांचे सुधारित मंजूर करण्यात आले तसेच आगामी ५९ कोटी ५५ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे आदी उपस्थित होते.

वैशिष्ट्यपूर्ण योजना

प्राथमिक शाळातून ओपन सायन्स पार्क व एआय रोबोटिक लॅब विकसित करणे ५० लाख, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल ३० लाख, शिष्यवृत्तीच्या सराव परीक्षांसाठी (मिशन आरंभ ) २२ लाख, शिष्यवृत्ती परीक्षेचे विद्यार्थी शुल्क, सराव, प्रश्नसंच पुस्तिका, संच छापणे १ कोटी, माझी आदर्श शाळा विकसित करणे ५ लाख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना ५ लाख, शेतकऱ्यांना स्लरी फिल्टर उपकरण अनुदान ४० लाख, ड्रोन फवारणी यंत्र ४९ लाख, ऊस, डाळिंब, केळी इतर पिकांची प्रात्यक्षिके कृत्रिम बुद्धिमत्तेवर (प्रिसिजन फार्मिंग) राबवणे ९० लाख, रस्ते व दळणवळण सुविधा ३.९० कोटी, तलावांची दुरुस्ती १ कोटी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान १.८४ कोटी शेतकऱ्यांना कडबाकुट्टी पुरवणे ७८ लाख, ५ वी ते १० पर्यंतच्या मुलींना मोफत सायकल ६५ लाख, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल ३४ लाख, मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाणबुडी मोटर खरेदी अर्थसाह्य ४२ लाख, हँड ऑपरेटेड पॉवर विडर खरेदीस अर्थसाह्य ६० लाख, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी पिठाची गिरणी ५० लाख, मागासवर्गीय महिलांना लघुउद्योगासाठी पिकोफॉल मशीन ७० लाख, अपंगांना पिठाची गिरणी ३० लाख ३० हजार, अपंगांना स्वयंरोजगारासाठी फोटोकॉपी मशीन ३२ लाख, शेवई मशीन २७ लाख ४० हजार, महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण ४७ लाख, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शेती साहित्य अनुदान १० लाख, पशुपालकांना दूध काढणी यंत्र अनुदान २० लाख, साथीच्या रोगात जनावरे मृत झाल्यास मालकांना भरपाई ३० लाख रू.

वैयक्तिक योजनांचे ६११० लाभार्थी

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ६६ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून जिल्ह्यातील ६११० वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याचे सीईओ आनंद भंडारी यांनी सांगितले. यंदा कृषी, पशुसंवर्धन व प्राथमिक शिक्षणावर अधिक तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.

विभागनिहाय तरतूदी

अ प्रशासन विभाग-१.९४ कोटी, सामन्य प्रशासन- १.६० कोटी, शिक्षण- ३.३० कोटी, बांधकाम (उत्तर)-२.३० कोटी लाख, बांधकाम (दक्षिण)- ५.४९ कोटी, लघु पाटबंधारे- १.५० कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा- ३.६८ कोटी, आरोग्य- ८८.५५ लाख, कृषी- २.२१ कोटी, पशुसंवर्धन- १.९६ कोटी, समाजकल्याण- ३.७६ कोटी, दिव्यांग कल्याण- ९२ लाख, महिला व बालकल्याण- १.८४ कोटी, ग्रामपंचातय- १.३९ कोटी , अर्थ विभाग- ९८ लाख रु.

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ५० लाख

भटक्या श्वानांच्या बंदोबस्तासाठी जिल्हा परिषदेने प्रथमच ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्याची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारले जाणार आहे. ठेकेदारामार्फत कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. १६ रुपये ५० पैसे प्रतिश्वान अशी तरतूद आहे. सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ग्रामीण भागात ४७ हजारांवर भटके कुत्री आहेत. गेल्या वर्षभरात १५ हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला.