अहिल्यानगर:जिल्हा परिषदेने गावोगावच्या कचरा संकलनासाठी एकत्रित खरेदी करून दोन टप्प्यात ३६७ ई-कचरागाड्यांचे (बॅटरीवर चालणाऱ्या) वितरण ग्रामपंचायतींना केले मात्र त्यातील १३० गावातील ई-कचरागाड्या वर्षभरातच धुळखात पडून राहिल्या किंवा अनेक गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या, वापर नसल्याने बॅटरी निकामी झाल्या आहेत. ग्रामपंचायतींचे ट्रॅक्टरमार्फत कचरा संकलन सुरू असतानाही तेथे बॅटरीवरील गाड्या दिल्या गेल्या आहेत. बॅटरीच्या गाड्या बंद पडल्याने काही ग्रामपंचायतींनी कचरा वाहतुकीसाठी पत्र्याचा पेटारा लावलेल्या सायकली घेतली आहेत. परिणामी ई- कचरा गाड्यांवर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च १३० गावातून कचऱ्यात गेल्याचे आढळून येत आहे.
जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक राहिलेल्या निधीतून पहिल्या टप्प्यात १७७ कचरागाड्या घेण्यात आल्या. त्याची किंमत प्रत्येकी २.५० लाख रुपये होती. त्यानंतर पुन्हा नाविन्यपूर्ण योजनेतून १९० कचरा गाड्या घेण्यात आल्या. त्याची किंमत ५.५० लाख रुपये होती.
जिल्हा परिषदेनेच दोनच महिन्यांपूर्वी, जानेवारीत केलेल्या सर्वेक्षणात १७७ पैकी ७४ व १९० पैकी ५६ अशा एकूण १३० ई कचरा गाड्या नादुरुस्त, बंद अवस्थेत धुळखात पडून आहेत. काही ठिकाणी कचरागाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याचे प्रकार घडले. वापरात नसल्याने बॅटऱ्या पुन्हा चार्ज झाल्या नाहीत, त्यामुळे गाड्या बंद पडल्या. रात्रीतून त्याचे साहित्य चोरीला घेत जाण्याचे प्रकार घडले. कुशन फाडले गेले, कचरागाडी चालवण्यासाठी ग्रामपंचायतकडे कर्मचारी उपलब्ध नाहीत, अशा विविध कारणांनी या गाड्या बंद अवस्थेत पडून आहेत. आता त्याचा वापर होत नाही.
पुरवठादाराची देखभाल व दुरुस्तीची मुदत वर्षभराची होती. ही मुदत संपण्यापूर्वीच काही ठिकाणी कचरागाड्या रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेमुळे लावलेल्या गेल्या आहेत. ट्रॅक्टर किंवा सायकलच्या पेटार्यातून कचरा वाहताना तो इतर वाऱ्याने उडतो व पुन्हा रस्त्यावर कचरा पडतो.
‘आंधळ दळतंय…‘
वरिष्ठ पातळीवरून खरेदी करून लादल्या गेलेल्या योजनेचे काय होते याचे उदाहरण म्हणून ई-कचरा गाडीकडे पहावे लागेल. निधी आहे म्हणून तो कसा खर्च करावा याचा विचार या योजनेमध्ये झालेला नाही. ‘आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खात’ अशी या योजनेची अवस्था झाली. काही ग्रामपंचायतीमधून ट्रॅक्टरमार्फत कचरा संकलन होत असतानाही तेथे गाड्या दिल्या गेल्या. कचरा संकलनासाठी ई-गाड्यांचा वापर केला जाईल, असे हमीपत्र जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीकडून घ्यायला हवे होते. –संदेश कार्ले, माजी सदस्य, जिल्हा परिषद.
दोन वेळेला बॅटऱ्या चोरीला गेल्या
ग्रामपंचायतीमार्फत पूर्वी कचरा संकलन ट्रॅक्टरमधून होत होते. नंतर आम्हाला दोन वर्षांपूर्वी बॅटरीवर चालणारी कचरागाडी देण्यात आली. मात्र महिनाभरातच त्याच्या बॅटऱ्या दोनदा चोरीला गेल्या. त्यामुळे सीसीटीव्हीच्या निगराणी खाली रात्री गाडी ठेवण्यात आली. मात्र तरीही कुशन फाडले गेले, आता पुन्हा ट्रॅक्टरमार्फत कचरा संकलन सुरू आहे. ई-कचरागाडी बंद अवस्थेत आहे. ट्रॅक्टरसाठी दरमहा पाच ते सहा हजार रुपयांचे डिझेल लागते. -स्वाती सुभाष बेरड, सरपंच दरेवाडी.
स्वनिधीतून दुरुस्ती करावी
बॅटरीवर चालणाऱ्या कचरागाड्या काही ठिकाणी ग्रामपंचायती वापरत नसल्याचे निदर्शनास आले. त्यांना त्या वापरात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतींनी नियमित बॅटऱ्यांचे चार्जिंग करावे व स्वनिधीतून देखभाल, दुरुस्ती करावी. कचरा संकलनात खंड पडू देऊ नये.
-दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत जिल्हा परिषद.
सर्वाधिक राहता तालुक्यात वाहने बंद अवस्थेत
सर्वाधिक ई-कचरागाड्या राहाता तालुक्यात ४३ गावांना वितरित करण्यात आल्या होत्या. त्यातील २५ गाड्या बंद आहेत. जामखेड मध्ये २४ पैकी १८ बंद आहेत. अकोल्यात १२ पैकी ९, संगमनेर मध्ये ३० पैकी ९, राहुरीत ३१ पैकी २ श्रीरामपूरमध्ये ८ पैकी ५, अहिल्यानगरमध्ये ३८ पैकी ८, कोपरगावमध्ये १० पैकी ६, नेवासात १७ पैकी ८, शेवगावमध्ये २८ पैकी १, पाथर्डीत ११ पैकी २, कर्जतमध्ये ३० पैकी १३, श्रीगोंद्यात ३२ पैकी १३, पारनेरमध्ये ३२ पैकी १२ वाहने बंद आहेत.
