अहिल्यानगर: अपंग व्यक्तींना शासकीय योजना, सेवासुविधांचा सुलभ व पारदर्शक पद्धतीने लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे. या उपक्रमामुळे अपंग नागरिकांना केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर इतरही शासकीय कार्यालयातून हेलपाटे न मारता एकाच ठिकाणी आवश्यक सर्व सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा अपंग सक्षमीकरण अधिकारी देवीदास कोकाटे यांनी दिली.
राज्य सरकारने अपंग व्यक्ती व त्यांच्यासाठी कार्य करणार्या संस्थांसाठी अपंग सहायक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज नोंदणी, तक्रार निवारण, प्रमाणपत्र आदी विविध योजनांची माहिती व इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या या डिजिटल प्रणालीमुळे अपंगांना सेवा देताना अधिक कार्यक्षमपणे, पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने लाभ देता येणार आहे. अपंग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या १७ योजनांची माहिती व अर्ज संबंधितांना घरबसल्या मोबाईलवरूनही करता येणार आहेत.
अपंगांसाठी कार्य करणार्या संस्थांची नोंदणी व प्रमाणपत्र नूतनीकरण, अपंग व्यक्तीसाठी विविध शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता पुरस्कार, साधने व उपकरण यासाठी अर्थसहाय्य, पुरस्कार योजना, शासकीय संस्थांमधून व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणार्या अपंग व्यक्तींना व्यवसाय संच व इतर साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य, सामाजिक सुरक्षिततेअंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना, मोदी आवास घरकुल योजना, रमाई आवास घरकुल योजना, विशेष साह्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी व ग्रामीण प्रमाण रूप दिव्यांगत्व असणार्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती यासह अन्य योजनांचा यात समावेश आहे.
तसेच अपंग क्षेत्रात कार्य करणार्या संस्थांना या पोर्टलवर आपली माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे. नव्याने या क्षेत्रात काम करू इच्छिणार्या संस्थांना लागणारे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी या शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी, तसेच संस्थांनी त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली.
पोर्टलवर नोंदणी करा
अपंगांच्या सक्षमीकरणासाठी अपंग साहय्यक पोर्टल हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र अपंग व्यक्तींनी या पोर्टलवर नोंदणी करून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी योजनांची व अपंग सहाय्यक पोर्टलची माहिती सर्वापर्यंत पोहचावी.
-आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
