अहिल्यानगर: महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली, त्यातून ६८ नगरसेवक निवडले गेले. आता महापौर कोण होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)-भाजप यांची युती असली तरी सर्वाधिक संख्याबळाच्या आधारावर महापौर पद राष्ट्रवादीकडे जाणार की पालकमंत्री राधाकृष्ण विखे ते भाजपसाठी खेचून आणणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका झाल्या असल्या तरी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने अद्याप महापौर पदाचे आरक्षण काढलेले नाही. त्यामुळे निवडूण आलेल्या नगरसेवकांना आता आपल्यापैकी कोण महापौर होणार, याची उत्सुकता लागलेली आहे. निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युतीने निर्विवाद वर्चस्व मिळवत ६८ पैकी ५२ जागा पटकावल्या. सर्वाधिक २७ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या तर भाजपला २५ जागा मिळाल्या आहेत. पालकमंत्री विखे यांनी अद्याप महापौर पदाबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले असले तरी सर्वाधिक संख्याबळाच्या आधारावर महापौर पदावर राष्ट्रवादीचा दावा प्रबळ ठरतो आहे. असे असले तरी पालकमंत्री पद भाजपकडे असल्यामुळे मंत्री विखे महापौर पद भाजपसाठी मिळवून देणार का, हा एक उत्सुकतेचा भाग झाला आहे.
भाजप-राष्ट्रवादी युतीचे बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ प्राप्त केल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता कमीच आहे. प्रश्न निर्माण झाला आहे तो प्रतिष्ठेचा. शिवाय त्यातून निम्म्या निम्म्या कालावधीचा तडजोडीचा फॉर्म्युला स्वीकारला जाऊ शकतो. अर्थात महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते आणि त्यासाठी कोण सक्षम उमेदवार आहे, यावरही ते अवलंबून राहील. याशिवाय उपमहापौर पद व महत्त्वाचे म्हणजे स्थायी समितीचे सभापतीपद, महिला व बालकल्याण समिती सभापती पद, सभागृह नेतेपद याच्या वाटपाचे चित्रही अद्याप मंत्री विखे व आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केलेले नाही.
महापालिकेची स्थापना सन २००३ मध्ये झाली. त्यावेळी महापौर पदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले व प्रथम महापौर म्हणून शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना मान मिळाला. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर सन २००६ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण होते, त्या पदावर काँग्रेसचे संदीप कोतकर विराजमान झाले. सन २००८ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण निघाले व संग्राम जगताप महापौर झाले. सन २०१० मध्ये महिला राखीव पदावर शिवसेनेच्या शिला शिंदे महापौर झाल्या. सन २०१३ च्या निवडणुकीनंतर संग्राम जगताप पुन्हा खुल्या प्रवर्गातून महापौर झाले. परंतु वर्षभरातच ते सन २०१४ मध्ये आमदार झाल्याने त्यांनी महापौर पद सोडले व राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर महापौर झाले. त्यानंतर सन २०१६ मध्ये महिला राखीव पदाच्या आरक्षणामुळे शिवसेनेच्या सुरेखा कदम महापौर झाल्या. सन २०१८ च्या निवडणुकीनंतर खुल्या प्रवर्गातून भाजपचे पहिले महापौर बाबासाहेब वाकळे झाले. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यानंतर सन २०२१ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अनुसूचित जमातीच्या राखीव पदावररोहिणी शेंडगे महापौर झाल्या.
यापूर्वी निवडणुकीच्या आधी महापौर पदाचे आरक्षण निघत असे परंतु आता निवडणूक झाली तरी आरक्षणाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
