संगमनेर : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना आज संगमनेरमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सध्याची दुष्काळी परिस्थिती, सहकारापुढील आव्हाने आणि बँकेने आजवर जपलेली राजकारणविरहित वाटचाल लक्षात घेता यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा सूर या बैठकीत होता. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांसह जिल्ह्यातील जवळपास सर्वपक्षीय महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित असल्याने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे.

प्रदीर्घकाळ बँकेची सूत्रे ताब्यात असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आज संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीला माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी खासदार डॉ. विखे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे आणि बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.

बँकेचा कारभार करताना यापूर्वीच्या सर्वच ज्येष्ठ विभूतींनी राजकारणापेक्षा बँकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. त्यातच सध्याची एकूणच परिस्थिती लक्षात घेता निवडणूक टाळून बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वांनी सकारात्मक विचार करण्याची भूमिका या बैठकीत प्रारंभीच मांडण्यात आली. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यापूर्वीही जिल्ह्यातील समविचारी मंडळींनी अनेकवेळा जपली आहे. त्याच परंपरेला पुढे नेत, राजकीय मतभेद बाजूला ठेवून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या व्यापक हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. जी नेतेमंडळी काही कारणांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकली नाहीत त्यांच्याशी समन्वय साधून त्यांना या भूमिकेसोबत घेण्याचा प्रयत्न करण्याचाही निर्णय बैठकीत झाला.

सकारात्मक प्रयत्न

बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण होणारी अनावश्यक राजकीय स्पर्धा टाळून बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे पुढे न्यावे. बँकेची प्रगती आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची भक्कम वाटचाल कायम राहावी, या सकारात्मक हेतूने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

निर्णय विखे, थाेरातांच्या हाती

जिल्हा बँकेचा अंतिम निर्णय राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात या दोघा आजी-माजी मंत्र्यांच्याच हातात आहे. आजच्या बैठकीला पालकमंत्री विखे उपस्थित नसले तरी, डॉ. सुजय विखे उपस्थित होते. मंत्री विखे यांच्यासह विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याशी थोरात यांच्यासह अन्य काही नेत्यांनी संपर्क साधून सहमती मिळवली असल्याची माहिती हाती आली.