अहिल्यानगर: ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच त्यामध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ‘लोकजल उत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतीवर भर दिला जाणार आहे. महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी केली जाणार आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहभागातून गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी ही माहिती दिली. या कालावधीत जलस्रोतांचे पुनर्जीवन व स्वच्छता केली जाणार आहे, पाणीपुरवठा योजनांचे औपचारीक हस्तांतरण व सामुदायिक शपथ दिली जाणार आहे. ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश केला जाणार आहे.

नदी उत्सवाच्या धर्तीवरच जल उत्सवाची परंपरा विकसित करण्यासाठी या कालावधीत भर दिला जाणार आहे. केंद्र सरकारने सन २०२४ मध्ये २० जिल्ह्यांमध्ये जल उत्सव प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. आता ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्ता पूर्ण पाणीपुरवठा करणे, हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजना, स्टॅन्ड पोस्ट, नळ पाणीपुरवठा योजना, दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिनप्रमाणे पुनर्जोडणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहांसाठी या योजनेतून नळजोडणी देण्यात येत आहे. एकाकी आदिवासी वाड्या- वास्त्यांसाठी सौर ऊर्जा आधारित नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा तालुका व ग्रामपंचायत अशा तीन स्तरावर जल उत्सव आयोजित केला जाणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी सांगितले.

शाश्वत पाणीपुरवठा

ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी जलमहोत्सव राबवला जाणार आहे. – राजेंद्र देसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता.

महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणार

पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक व सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जल उत्सव संस्थात्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागात समन्वय साधने, पाणी गुणवत्ता, सौरऊर्जा देखभाल दुरुस्तीसाठी आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण व महिला सक्षमीकरणाला जलसेवेची जोडणे हा जल महोत्सवाच्या उपक्रमाचा उद्देश आहे – हितेंद्र चव्हाण, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग.