मुंबई : नगर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या करोना अतिदक्षता विभागात लागलेल्या आगप्रकरणी हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत आरोग्य विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे व सुरेखा शिंदे आणि परिचारिका डॉ. सपना पठारे यांना सोमवारी निलंबित केले. तर परिचारिका अस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना बडतर्फ करीत त्यांच्या सेवा संपुष्टात आणण्यात आल्या.जिल्हा सरकारी रुग्णालयास शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत ११ करोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नगर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती आणि संबंधितांशी चर्चा केली होती. याप्रकरणी चौकशीचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. त्यानंतर आरोग्य खात्याने जिल्हा शल्यचिकित्सकांसह संबंधितांवर कारवाईचा निर्णय घेतल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.