अहिल्यानगर: महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपचे सुभाष लोंढे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दिपाली नितीन बारस्कर व उपसभापती पदासाठी भाजपच्या वर्षा रोहन सानप यांचे अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या युतीमध्ये स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे तर महिला व बालकल्याण समितीचे सभापती पद राष्ट्रवादीकडे असे वाटप झालेले आहे. सुभाष लोंढे हे भाजपमधील विखे समर्थक म्हणून ओळखले जातात. निवडणुकीपूर्वी काहीच दिवस‌ आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व त्यांची लगेच सभापतीपदी वर्णी लागली. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वीही त्यांची एकत्रित शिवसेनेकडून सभापती म्हणून निवड झाली होती. सुभाष लोंढे हे पहेलवान आहेत. अर्थात या तिन्ही पदांसाठी उद्या, मंगळवारी पिठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा होत आहे. या निवड सभेत या तिघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली जाईल.

या तिन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, सायंकाळपर्यंत अंतिम मुदत होती. या मुदतीत एकमेव अर्ज दाखल झाल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. स्थायी समिती सभापती पदाच्या उमेदवारीसाठी सुभाष लोंढे यांच्या अर्जावर नगरसेवक मनोज कोतकर सुचक आहेत तर निखिल वारे अनुमोदक आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी दिपाली बारस्कर यांच्या अर्जावर सुनिता किसन भिंगारदिवे यांचे सूचक म्हणून तर अनिता विपुल शेटीया अनुमोदक म्हणून आहेत.

उपसभापती पदासाठी वर्षा सानप यांच्या उमेदवारी अर्जावर वंदना विलास ताठे सुचक तर रोशनी आकाश त्रंबके अनुमोदक आहेत. नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे हे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करताना महापौर ज्योती गाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते.

महापालिकेत राष्ट्रवादी व भाजप यांच्या युतीने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. त्यामुळे महापौर उपमहापौर यांच्यासह सभापती व उपसभापती पदाच्या निवडी बिनविरोध होत आहेत. महापौर व उपमहापौर यांच्याप्रमाणेच स्थायी समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा कार्यकालही सव्वा वर्षाचा असण्याची शक्यता आहे.