मुंबई : जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या एआय फॉर ॲग्री २०२६, या जागतिक परिषदेत सरकारच्या पैशाची उधळपट्टी झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. दुपारच्या एका जेवणावळीवर तब्बल ५२.४९ लाख रुपये खर्च झाले आहेत. या शिवाय अन्य खर्चाच सविस्तर तपशील देणेही टाळले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा, यासाठी ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ च्या अंतर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ (एआय फॉर ॲग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती.
माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या माहितीमधून प्रत्यक्षात या परिषदेत शेतकरी हिताच्या नावाखाली पैशांची उथळपट्टी झाल्याचे दिसत आहे. दोन दिवसांचे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचे भाडे ३२ लाख रुपये. २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी परिषद असतानाही २१ फेब्रुवारी १०० लोकांचा जेवणाचा खर्च २.८० लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.
२२ रोजीचा दिवसभराचा जेवणाचा सुमारे हजार लोकांचा एकूण खर्च ८३.२ लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. त्यात दुपारच्या जेवणाचा १८१० लोकांचा खर्च ५२.४९ लाख रुपये आणि बिगर अल्कोहोलिक पेयाचा ३.५० लाख रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. २३ फेब्रुवारी रोजी जेवणाचा एकूण खर्च ४६.३० लाख रुपये दाखविला आहे. या तीन दिवसांचा चहा आणि कॉफीसाठी १.८५ लाख रुपये खर्च झाल्याचे म्हटले आहे. वाय – फाय आणि अन्य सेवांचा खर्च ३.२ लाख रुपये दाखविण्यात आला आहे.
खर्च पाच कोटींचा, लेखापरिक्षण दोन कोटींचे
एआय फॉर ॲग्री २०२६ या परिषदेसाठी ५ कोटी १ लाख ५५ हजार ८६९ रुपये एकूण खर्च आला आहे. त्यात कार्यालयीन खर्च (एकत्रित जिओ भाडे) – १ कोटी ८८ लाख २२ हजार ९१५ रुपये. जाहिरात व प्रसिद्धीचा खर्च – १४ लाख ६२ हजार ९४४ रुपये.
अन्य खर्चात १ कोटी ९५ लाख ६५ हजार ५०८ रुपये भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि १ कोटी २ लाख ९९ हजार ३२८ पॅरामिन ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग असोसिएट्स, असा एकूण ५ कोटी १ लाख ५५ हजार ८६९ रुपये एकूण खर्च आला आहे. त्यापैकी फक्त दोन कोटी रुपयांचे लेखापरिक्षण करण्यात आले आहे. त्यात बैठक खर्च, प्रिटिंग खर्च, जाहिरात खर्च, डिझाईन खर्च, प्रमुख पाहुण्यांना भेटवस्तू, स्मृतीचिन्ह खर्च आणि अन्य खर्च, असे एकूण १ कोटी ९५ लाख ६५ हजार ५०८ रुपयांचा समावेश आहे. उर्वरित खर्चांचे अद्याप लेखापरिक्षण झालेले नाही.
घाई गडबडीत घेतलेली जागतिक परिषद
राज्य सरकारने महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५ – २०२९ जाहीर केले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात रुपये ५०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यापैकी २० कोटींचा निधी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मिळाला. मार्चअखेर निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट होते. अर्थ विभागाकडून प्रत्यक्षात निधी मिळण्यास मार्च महिना उजाडला. त्यामुळे मार्चअखेर पूर्वी घाई गडबडीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला परिषदेचे उद्घाटन झाले. त्यामुळे या जागतिक परिषदेला मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि कृषी विभागाचे अधिकारी अपेक्षित वेळ देऊ शकले नाहीत. परिणामी या जागतिक परिषदेतून शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडल्याची स्थिती नाही.
सहभागींची संख्या दुप्पट झाल्यामुळे खर्च वाढला
एआयच्या जागतिक परिषदेसाठी १,५०० जणांचा सहभाग अपेक्षित होता. प्रत्यक्षात विविध संशोधन संस्था, संयुक्त राष्ट्रासह विविध जागतिक संस्था, संघटना आणि देशांचे प्रतिनिधींनी, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिले. त्यामुळे एकूण सहभागी व्यक्तींची संख्या तीन हजारांवर गेली, त्यामुळे जेवणासह अन्य खर्चात मोठी वाढ झाली. या जागतिक परिषदेला आयआयटी मुंबईसह अनेक नामांकित संस्थांनी मोफत सहकार्य केले आहे, अशी माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी तंत्रज्ञान नाविण्यता केंद्राचे (एआयएआयसी) व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत आंडगे यांनी दिली.
